हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे नेहमी प्रवाशांना फायदेशीर ठरतील अशा नियमांची आखणी करत असते. रेल्वे प्रशासनाने आता अॅडव्हान्स रिझर्वेशनच्या नियमांमध्ये बदल केला आहे. नवीन नियमांनुसार तुम्ही केवळ 60 दिवस आधीच तिकीट बुक करू शकता. याआधी हा कालावधी 120 दिवस म्हणजेच चार महिने होता. या निर्णयाचा लाभ रेल्वेला तसेच प्रवाशांनाही होणार आहे. प्रवाशांच्या हितासाठी आणि बदलत्या काळाच्या गरजेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
रिझर्वेशनच्या नियमांमध्ये बदल
रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, अनेक प्रवासी 120 दिवस आधी तिकीट बुक करतात, पण नंतर ते रद्द करतात. तसेच काही प्रवासी तिकीट ब्लॉक करून फसवणूक करतात. या दोन मुख्य कारणांमुळे रेल्वेने नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अंदाजे 21% तिकिटे रद्द होतात आणि 4 ते 5% प्रवासी प्रवासच करत नाहीत. यामुळे अनेक प्रवाशांना तिकिटे मिळत नाहीत, त्यामुळे रेल्वेने नवीन नियमांच्या मार्गदर्शक सूचना सर्व स्टेशन आणि तिकीट काऊंटरवर पाठवल्या आहेत.
अॅडव्हान्स बुकिंगचा कालावधी
ज्या प्रवाशांनी 120 दिवस आधी तिकीट बुक केले आहे, त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. ते त्या तिकिटावर प्रवास करू शकतात. हा नियम 1 नोव्हेंबरपासून लागू झाला आहे. पण ताज एक्सप्रेस आणि गोमती एक्सप्रेस या गाड्यांच्या बुकिंग नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तसेच भारतीय रेल्वेच्या अॅडव्हान्स बुकिंग नियमांचा विदेशी पर्यटकांवर परिणाम होणार नाही. ते 365 दिवस आधी तिकिटे बुक करू शकतात. भारतीय रेल्वेने विदेशी पर्यटकांना सुविधा देण्यासाठी अॅडव्हान्स बुकिंगचा कालावधी एका वर्षाचा ठेवला आहे. या नवीन नियमामुळे विशेष गाड्यांची योजना अधिक योग्य पद्धतीने करता येणार आहे . या नियमामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या अचूकपणे ओळखू शकेल आणि सणांच्या काळात स्टेशनवरील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य संख्येत विशेष गाड्या चालवू शकेल.
एआय करेल सीट अलॉट
भारतीय रेल्वे आपल्या सीट अलॉट तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरणार आहे. एआय प्रणाली प्रवाशांच्या माहितीवर आणि उपलब्ध सीटवर आधारित सीट अलॉट करेल. ट्रेनचे सीट चार्ट प्रवासाच्या चार तास आधी तयार होतात. एआय प्रणाली ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, कारण हि सिस्टम त्यांना प्राधान्याने सीट अलॉट करेल.