16 जानेवारी 2021 रोजी भारत सरकारने राष्ट्रीय स्टार्टअप दिवस घोषित केला. त्यानंतर दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस स्टार्टअप्सच्या विकासासाठी साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशभरातील तरुणांना संबोधित करताना मोठी घोषणा केली. “महाराष्ट्र लवकरच इनोव्हेशन सिटीच्या उभारणीसाठी पुढाकार घेईल,” असे ते म्हणाले.
स्टार्टअप धोरणाचा नवा मसुदा तयार
CM फडणवीस म्हणाले की, स्टार्टअप धोरणाचा नवा मसुदा तयार करण्यात आला आहे, जो लवकरच उद्योजकांच्या सूचनांनुसार लागू केला जाईल. भारतीय लघु औद्योगिक विकास बँक (सिडबी) ने स्टार्टअप्ससाठी 200 कोटी रुपयांचे निधी मंजूर केले असून, प्रत्येक विभागाला 30 कोटी रुपये वाटप केले जातील.
मुख्यमंत्री जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई येथे “एम्पॉवरिंग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र” या विषयावर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवकल्पना विभागांतर्गत आयोजित राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कार्यक्रमात बोलत होते.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त प्रदीप कुमार डांगे, मेरिको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मारीवाला, नायका संस्थापक आणि सीईओ फाल्गुनी नायर, अपग्रेडचे सह-संस्थापक रोनी स्क्रूवाला, तसेच इतर अनेक दिग्गज उपस्थित होते.
1000 हून अधिक स्टार्टअप्स सहभागी
महाराष्ट्रासह देशभरातून तंत्रज्ञान, कृषी, सेवा क्षेत्र, औषधनिर्माण आणि पर्यटन अशा विविध क्षेत्रातील 1000 हून अधिक स्टार्टअप्सने या कार्यक्रमात सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “नवीन उद्योजक व महिला उद्योजकांचे नवोन्मेष प्रोत्साहित करून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास केला जाईल.”
महाराष्ट्रात 26,000 स्टार्टअप्स
सध्याच्या घडीला राज्यात सध्या 26,000 स्टार्टअप्स कार्यरत आहेत.महाराष्ट्रात सर्वाधिक महिला संचालक असून, महिलांच्या सहभागाला चालना देण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. मुंबई वित्तपुरवठ्यात आघाडीवर आहे, तर पुणे तंत्रज्ञान व नवकल्पनेचे केंद्र आहे. नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, आणि कोल्हापूरसारखे शहर स्टार्टअप्ससाठी उत्कृष्ट पर्यावरणीय प्रणाली तयार करत आहेत.




