हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लांबचा प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हलर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. न्यूगो (NueGo Bus) या कंपनीने देशातील पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक एसी स्लीपर बस सेवा सुरू केली आहे. ही सेवा दिल्ली-अमृतसर, बेंगळुरू-चेन्नई, हैदराबाद-राजमुंद्री, चेन्नई-मदुराई, विजयवाडा-विशाखापट्टणम आणि बेंगळुरू-मदुराई यासारख्या प्रमुख मार्गांवर सुरू असणार आहे.
प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक सुविधा
ही बस 450 kWh क्षमतेच्या HV बॅटरीसह सुसज्ज आहे. त्यामुळे ती एका चार्जमध्ये सुमारे 350 किलोमीटर प्रवास करू शकते. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामुळे या बसची रेंज वाढवून 600 किलोमीटरपर्यंत करता येते. या बसमध्ये स्पीड लॉक (80 किमी प्रतितास), मोनोकॉक चेसिस, एबीएस ब्रेकिंग सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
न्यूगोच्या या नव्या बसमध्ये स्लीपर बर्थ हे अधिक आरामदायक आणि एर्गोनॉमिक डिझाइनसह सुसज्ज आहेत. प्रवाशांसाठी सॉफ्ट टच इंटिरिअर, एम्बियंट एलईडी लाइटिंग, यूएसबी चार्जिंग पोर्ट, नाईट रीडिंग लॅम्प आणि अत्याधुनिक स्वच्छतागृहे देखील उपलब्ध आहेत. यासह महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 24×7 हेल्पलाइन, पिंक सीट फीचर, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स, जीपीएस ट्रॅकिंग आणि ड्रायव्हर ब्रेथ अॅनालायझर टेस्ट यांसारख्या विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, न्यूगोच्या या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळणार आहे. यासह देशाच्या हरित भविष्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले जाईल. इतकेच नव्हे तर प्रवाशांना देखील एका वेगळ्या पद्धतीने प्रवासाचा आनंद लुटता येईल.