हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अखेर जेईई मेन्स परीक्षेचा (JEE Main Exam 2024) सत्र दोनचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालासह टॉपर्सची यादीही जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, यंदा विदर्भातील निलकृष्ण गजरे (Nilkrishna Gajare) या विद्यार्थ्याने जेईई मेन परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे. नीलचे आई-वडील शेतकरी आहेत. त्यामुळे आज देशातील चहूबाजूंनी नीलवर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. नीलने या परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवून यशाची एक पायरी गाठली आहे..
जेईई मेन्स परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावलेला निलकृष्ण गजरे वाशिम जिल्ह्यातील मूळचा रहिवासी आहे. परंतु त्याने नागूपरमध्ये राहून जेईई परीक्षेचा अभ्यास केला. निलचे वडील हे शेतकरी असून आई गृहिणी आहे. नीलला एक लहान बहिण आहे. निल लहानपणापासूनच एक हुशार विद्यार्थी राहिला आहे. त्याने दहावीच्या परीक्षेत तब्बल 97 टक्के मार्क मिळवले आहेत. सध्या तो आयआयटीमधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेण्यासाठी अभ्यास करत आहे. याचाच एक भाग असलेल्या जेईई परीक्षेत त्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
जेईई परीक्षेमध्ये नीलने 100 पर्संटाईल मिळवून एक मोठे यश संपादन केले आहे. तो या परीक्षेसाठी गेल्या दोन वर्षांपासून अभ्यास करत होता. अखेर त्याने या परीक्षेत बाजी मारत आपल्या कुटुंबाची मान अभिमानाने उंचावली आहे. दरम्यान, मिळालेल्या यशाबाबत प्रतिक्रिया देताना नीलने म्हणले आहे की, “मी माझ्या यशाचे श्रेय पालकांना देतो. त्यांनी मला शिकवण्यासाठी खूप त्याग केला आहे. एखादया वेळी मला चांगले गुण मिळाले नाही तर आई-वडील प्रोत्साहन द्यायचे. आज त्यांच्यामुळे मी हे यश मिळवू शकलो आहे”