निलेश राणे निवृत्तीचा निर्णय मागे घेणार? देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी भाजपचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून आपल्या राजकिय निवृत्तीची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर त्यांना मनवण्यासाठी भाजप नेत्यांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले. यादरम्यान आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavhan) यांनी नीलेश राणेंची भेट घेतली. या भेटीनंतर, चव्हाण आणि राणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  यांच्या भेटीसाठी सागर या बंगल्यावर पोहचले. या बंगल्यावर तिन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. या भेटीनंतर आता निलेश राणे यांनी आपला निर्णय मागे घेतल्याच्या चर्चा राजकिय वर्तुळात रंगल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत निलेश राणे देखील उभे होते मात्र त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. परंतु, रवींद्र चव्हाण यांनी माहिती दिली की, “नीलेश राणेंनी ट्विट केल्यानंतर काय घडले हे माहीत नव्हते. आज सकाळी नीलेश राणेंशी चर्चा केली. देवेंद्र फडणवीसही या विषयावर बोलले, काहीतरी घडले होते म्हणून हे सर्व होत आहे. संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येकाला छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांवरही अन्याय होऊ नये, अशी नीलेश राणेंची इच्छा होती. या कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत. या गोष्टींचा आम्ही गांभीर्याने विचार केला”

त्याचबरोबर, “लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा आम्ही विचार करत असतो. प्रत्येकाच्या भावना असतात. त्या भावना आम्ही जाणून न घेतल्यामुळे नीलेश राणे नाराज होते. त्यामुळे त्यांनी नाराजीतून हा निर्णय घेतला होता. राणेंची नाराजी स्वाभाविक होती, पण यापुढे असे काही घडणार नाही आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील कोणत्याही निवडणुका असोत. ग्रामपंचायत निवडणूक असो वा लोकसभेची छोट्या-छोट्या कार्यकर्त्याचीही नाराजी दूर होईल, याची आम्ही काळजी घेऊ” असे आश्वासन चव्हाण यांनी दिले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधल्यानंतर आता निलेश राणे हे निवृत्तीचा निर्णय मागे घेणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप या विषयावर निलेश राणे यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे नीलेश राणे काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, या भेटीमुळे नीलेश राणे यांची नाराजी दूर झाली असल्याचे देखील म्हणले जात आहे.