‘निसर्ग’ आपली परीक्षा घेत आहे, तेव्हा घरातच सुरक्षित राहा; मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चक्रीवादळाच्या काळात कोणती काळची घ्यावी याबाबत मार्गदर्शन केलं. सध्या राज्यात करोनाचं संकट उभं ठाकलं आहे. त्यातच निसर्ग हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. निसर्ग आपली परीक्षा घेणं सोडत नाहीये, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. जीवनावश्यक वस्तू व्यवस्थित सांभाळून ठेवा असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. १०० ते १२५ किमीच्या वेगाने सोसाट्याचा वारा आणि पाऊस असं येणार आहे. त्यामुळे काळजी घ्या, प्रशासन तुमच्यासोबत आहेच असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर यापूर्वी वादळं येऊन गेली. पण हे नुसतं वादळ नसून चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळाची तीव्रता अधिक आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. आपल्याव करोनाचे संकट आले. त्याचा सामना आपण धैर्याने केला. आता या निसर्ग वादळाचाही धैर्याने सामना करू. योग्य काळजी घेतल्यास आपण या संकटातून सुखरुप बाहेर पडू. वादळाच्या काळात आणि वादळानंतर अनावश्यक विजेची उपकरणं वापरू नका. तुमच्याकडील बॅटरी चार्ज करून घ्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आलं आहे. अलिबागजवळ हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ कदाचित हल्ली काही दिवसांमध्ये झालेल्या वादळांपेक्षा मोठं चक्रीवादळ आहे. प्रार्थना हीच आहे की हे वादळ हवेत विरुन जावं. प्रार्थनेला यश नक्कीच मिळेल असा विश्वास वाटतो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आपण सज्ज आहोतच. NDRF च्या १५ तुकड्या आहेत. तसेच नौदल, वायुदल, लष्कर आणि हवामान विभाग या सगळ्यांमध्येही समन्वय आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. करोनाचं संकट आपण जसं थोपवून धरलं आहे आणि ते परतवून लावणार आहोत तसंच हे वादळाचं संकट आपण परतवून लावू असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

केंद्र सरकार तुमच्यासोबत आहे जी काही मदत लागेल ती सांगा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. तसंच सोमवारी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही यासंदर्भात सर्वतोपरी मदत करणार असल्याचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितल्याची माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment