व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

लघुशंकेनी धरणाची उंची वाढवणारे…; अजित पवारांनी टिल्ल्या म्हणताच राणेंची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या विधानावरून नितेश राणे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. याबाबत विचारलं असताना अजितदादांनी नितेश राणेंचा उल्लेख टिल्ल्या असा केला होता. त्यांनतर राणेंनी पुन्हा एकदा ट्विट करत अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. लघुशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले आहे. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली असा पलटवार त्यांनी केला आहे.

नितेश राणेंनी ट्विट करत म्हंटल की, लघुशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले आहे. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली. तसेच हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची ‘ टीका सहन होत नाही. त्यामुळेच यांचे काका छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.

अजितदादा नेमकं काय म्हणाले होते-

छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षकहोते असं विधान अजित पवार यांनी केल्यांनतर भाजपाकडून अनेक ठिकाणी आंदोलने आणि निदर्शने करण्यात आली. यावेळी नितेश राणे यांनी सुद्धा होय आम्ही, हिंदवी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीरच म्हणणार. मी ही गोष्ट धरणवीर अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगत आहे असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता. त्याबाबत अजित पवारांना विचारलं असता टिल्ल्या लोकांनी सांगण्याची गरज नाही. त्यांची उंची आणि झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ? त्यांना उत्तर आमचे इतर प्रवक्ते देतील, असं प्रत्युत्तर त्यांनी दिले.