फडणवीस दिल्लीला गेले तर .. ; नितीन गडकरींचे मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर काय होते हे मला माहित आहे असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असे मी म्हणणार नाही. परंतु, देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर बावनकुळे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे, असे म्हणत त्यांनी बावनकुळे यांची राजकीय दिशा स्पष्ट केली. नागपुर येथील भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष झाले, हे आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे असे गडकरी म्हणाले. एका ऑटोरिक्षा चालवणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद मिळेपर्यंतचा बावनकुळे यांचा प्रवास हा प्रेरणादायी असल्याचेही गडकरींनी सांगितले. बावनकुळे यांनी खूप मेहनत घेतली आहे. राज्यात भाजप वाढविण्यासाठी ते महाराष्ट्रात फिरले. ऊर्जा खात्यातही त्यांनी मोठे काम केले आहे असे म्हणत गडकरींनी बावनकुळे यांची स्तुती केली.

भाजप प्रदेशाध्यक्षपद हे मोठे पद आहे आणि हे पद मिळाले तर ती व्यक्ती पुढे काय काय होते हे मला माहित आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसच होतील पण, कदाचित फडणवीस दिल्लीत गेले तर बावनकुळेंना मुख्यमंत्री पदाची संधी असल्याचे सूचक वक्तव्य यावेळी गडकरी यांनी केले. गडकरींच्या या विधानानंतर राजकीय चर्चाना उधाण आलं आहे.