वायव्य मुंबईत बाप- लेकांत सामना होणार? की भाजप संधी साधणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई उपनगरांचा अगदी छोटासा भाग व्यापणारा…प्रसिद्ध वकील राम जेठमलानी ते अभिनेते सुनील दत्त यांनी प्रतिनिधित्व केलेला मतदार संघ म्हणजे वायव्य मुंबई…अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी आणि दिंडोशी या उपनगरांमध्ये आधी काँग्रेस आणि मागील दोन दशकांपासून शिवसेनेला बळ देणारा हा मतदारसंघ तसा इंटरेस्टिंग झालाय…कारण शिंदेंच्या बंडानंतर त्यांचे विश्वासू समजले जाणारे खासदार गजानन कीर्तिकर(Gajanan Kirtikar) हे शेवटी का होईना पण शिंदे गटात गेले…मात्र त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) हा ठाकरेंसोबतच राहिला…संपूर्ण राज्यभरातून बंडाळी झाली पण वायव्य मुंबई मधून शिवसेनेचा एकही आमदार फुठला नाही…

2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे वरिष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी वायव्य मुंबई मतदारसंघावर ( Northwest Mumbai Lok Sabha) शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला…यानंतर 2019 ला देखील काँग्रेसच्या संजय निरुपम यांना धूळ चारत कीर्तीकरांनी सलग दुसऱ्यांदा दिल्ली गाठली… दुसरीकडे शिंदेंच्या बंडाळीनंतर खासदार गजानन किर्तीकर यांनी पुढील राजकीय प्रवासासाठी उद्धव ठाकरेंचा हात सोडून एकनाथ शिंदेंचा हात पकडला असला, तरी त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर हे मात्र उद्धव ठाकरेंसोबतच राहिले… आणि हाच या सगळ्यातला महत्त्वाचा ट्विस्ट ठरलाय… कारण गजानन कीर्तिकरांनी शिंदे गटाकडून याच जागेवर पुन्हा निवडणूक लढण्याची घोषणा केलीये…

तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी राजकीय खेळी करत अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा केलीये…त्यामुळे वडील विरुद्ध मुलगा अशी महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली वहीलीच फाईट या मतदारसंघाच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळू शकते…जर असं झालं तर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत होणार असल्याने वायव्य मुंबईची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे… मात्र उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तिकर याना तिकीट दिल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला काँग्रेस नाराज असल्याचे बोललं जात आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी बोलूनही दाखवली.

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यामध्ये जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम असे एकूण सहा मतदार संघ येतात… 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर, दिंडोशीमध्ये सेनेचेच सुनील प्रभू आणि अंधेरी पूर्वमध्ये रमेश लटके विजयी झाले होते. रमेश लटके यांचं परदेशात निधन झाल्यानंतर त्याजागी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी ऋजुता लटके या विजयी झाल्या… रवींद्र वायकर यांनी नुकतीच ठाकरेंची सोडलेली साथ वगळता बाकीचे दोन्ही आमदार सध्या ठाकरेंसोबतच आहेत… तर उर्वरित गोरेगाव वर्सोवा आणि अंधेरी पश्चिम या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत…त्यामुळे भाजपनेही या मतदारसंघाची मागणी लावून धरलेली आहे… त्यामुळे वायव्य मुंबईत कीर्तिकर बाप- लेकांत सामना होणार? की भाजप संधी साधणार? हे आता पाहावं लागेल.