हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । ओडिशातल्या बालासोरमध्ये (Odisha Train Accident) शुक्रवारी रात्री 3 रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात जवळपास 300 लोक मृत्युमुखी पडले तर हजारहून अधिक जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात नेमका झाला कसा? याबाबत भारतीय रेल्वे बोर्डाने पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे.
रेल्वे बोर्ड सदस्य जया वर्मा सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत या अपघाताची माहिती देत सांगितलं की, ज्या स्टेशनवर हा अपघात झाला तेथे 4 प्लॅटफॉर्म आहेत. मध्यभागी 2 मुख्य लाईन आणि बाजूंना 2 लूप लाईन आहेत. लूप लाइनवर एक मालगाडी उभी होती. कोरोमंडल एक्सप्रेस शालिमार रेल्वे स्थानकावरून हावडा दिशेहून चेन्नईला जाण्यासाठी येत होती, त्यासाठी ग्रीन सिग्नल होते आणि सर्व काही सेट होते. ओव्हरस्पीडिंगचा प्रश्नच नव्हता. ग्रीन सिग्नल असल्याने ट्रेन ड्रायव्हरला त्याच्या ठरलेल्या वेगानुसार न थांबता 128 किलोमीटर वेगाने पुढे जात होता. तर दुसरीकडे यशवंत एक्स्प्रेसही ताशी 126 किमी वेगाने येत होती. दोन्ही रेल्वेंसाठी सिग्नल ग्रीन होते. ग्रीन सिग्नल असल्याने स्पीडचा प्रश्नच नव्हता.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त कोरोमंडल ट्रेनचा अपघात झाला. काही कारणास्तव त्या ट्रेनला अपघात (Odisha Train Accident झाला आणि इंजिन आणि कोच मालगाडीच्या वर चढले. मालगाडी लोखंडी असल्याने ती वजनदार होती त्यामुळे जागची हालली नाही. उलट प्रवाशांनी भरलेली कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीवर चढली. जोरदार धडक बसल्याने ट्रेनचे डबे इकडे तिकडे उडून पडले . त्यामुळे डाऊन मार्गावरून जाणाऱ्या यशवंतपूर एक्स्प्रेसला यातील काही डबे धडकले. त्यामुळे यशवंतपूर एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरून दुसऱ्या बाजूला गेले आणि हा भीषण अपघात झाला असं जया वर्मा सिन्हा यांनी सांगितलं.
प्राथमिक तपासानुसार आतापर्यंत जी कारणे समोर आली आहेत त्यामध्ये सिग्नलिंगमध्ये समस्या आढळून आली असून, रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. त्यांचा तपास पूर्ण होईपर्यंत अधिक काही सांगता येणार नाही. परंतु आम्ही या भीषण अपघाताची सखोल चौकशी करत आहोत असेही त्यांनी म्हंटल.