दिवाळी पूजनात बनवा हे खास नैवेद्य; श्री गणेश आणि लक्ष्मी माता होईल प्रसन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मात दिवाळी सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. दिवाळी दिवशी रात्री शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करण्यात येते. यावेळी माता लक्ष्मीसाठी विशेष नैवेद्य तयार केला जातो. तर, श्री गणेशाला देखील विविध भोग अर्पण केले जातात. आज आपण अशाच दोन पदार्थांच्या रेसिपीत जाणून घेणार आहोत. जे पदार्थ आपल्याला नैवेद्य म्हणून माता लक्ष्मी आणि श्री गणेशाला अर्पण करता येतील. (Diwali Food And Recipe)

1) तांदळाची खीर

– तांदळाची खीर बनवण्यासाठी सर्वात प्रथम तुपामध्ये ड्रायफ्रूट्स घालून भाजून घ्या. यानंतर खिरीसाठी घेतलेले तांदूळ स्वच्छ धुवा आणि ते देखील भाजून घ्या.

– तांदूळ गोल्डन रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजा. यानंतर त्यात आवश्यक तेवढे दूध घाला. दूध उकळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घाला आणि हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या.

– पुढे तुम्हाला हवे असल्यास त्यामध्ये केसर टाका. तसेच ओल्या नारळाचा थोडा किस देखील टाका. ही कृती केल्यानंतर तुमच्या गोडीनुसार दुधात साखर टाका.

– यानंतर खीर व्यवस्थित एकजीव करून मंद आचेवर शिजायला ठेवा. खिरीवर साय दिसू लागली की ती ढवळून त्यामध्ये तुम्ही तळलेले ड्रायफ्रूट्स घाला. आणि पुन्हा एक उकळी काढा.

– अशा पद्धतीने तुम्ही सरळ साधी सोपी तांदळाची खीर लक्ष्मी मातेच्या नैवेद्यासाठी बनवू शकता.

2) रव्याचा शिरा

– रव्याचा शिरा बनवण्यासाठी सर्वात प्रथम एका कढईमध्ये तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घ्या. ते व्यवस्थित भाजल्यानंतर कढईतून ड्रायफ्रूट्स काढून घ्या.

– पुढे पुन्हा त्याच कढईत रवा घाला. हा रवा त्या तुपामध्ये गोल्डन रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या. रवा व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी टाका.

– रवा मऊ शिजण्यासाठी त्याला मंद आचेवर ठेवा. यानंतर त्यात साखर घाला ही साखर रव्यामध्ये व्यवस्थित एकजीव करा.

– साखर व्यवस्थित विरघळल्यानंतर त्यामध्ये केसर दूध घाला. (हे दुध अर्धा कपच असूद्या)

– यानंतर त्यात ड्रायफ्रूट्स घाला. ते घातल्यानंतर एक दोन मिनिटांसाठी रवा मंद आचेवर ठेवा.

अशा पद्धतीने थोड्या वेळातच तुमचा शिरा तयार असेल. हा शेरा तुम्ही नैवेद्य म्हणून माता लक्ष्मी आणि श्री गणेशाला अर्पण करू शकता.