मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न; विठ्ठलाच्या गजरात पंढरी दुमदुमली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।आज आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2024) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बळीराजा सुखी होऊ दे. त्याच्या जीवनात समृद्धी येउदे असं साकडं विठुरायाकडे घातलं. आजच्या पूजेला मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय 55 वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय 50 वर्षे) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. अहिरे दाम्पत्य गेल्या 16 वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत.

या पूजेनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी विठ्ठलाकडे नेहमी जनतेसाठी बळीराजासाठी मागणं मागत असतो. बळीराजा सुखी होऊ दे. चांगला पाऊस होऊ दे, चांगल पिक येऊ दे. बळीराजाच्या जीवनात समृद्धी होउदे . या राज्यातील जनता सुखी होऊ दे. राज्यातील प्रत्येक घटक यांच्या जीवनात आनंदाचे दिवस विठ्ठलाने आणावे असं मागणं देखील मागितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आज सळीकडे भक्तीमय वातावरण झालं आहे. यावर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशिर्वादाने राज्याचा कारभार सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे असं साकडं आपण विठुरायाला घातलं अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, आज खरं म्हणजे सगळ्यांना आपली पूजा चालू असताना देखील मुखदर्शन बंद केले नाही. ते चालू ठेवलं कारण शेवटी अठरा अठरा तास आपले वारकरी रांगेमध्ये उभे राहतात आणि त्यांना पांडुरंगाचे दर्शन घ्यायचं असतं. पण आपल्या शासकीय पूजेमध्ये दर्शन बंद केले जायचे. पण गेल्यावर्षीपासून आपलं मुखदर्शन देखील सुरु ठेवलं. व्हीआयपी लोकांपेक्षा वारकऱ्यांना पहिले प्राधान्य देण्याचं काम आपण केलंय”, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले.