पुणेकरांनो, अॅप कॅबचा प्रवास आता होणार अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक होणार आहे. पुण्यामध्ये नोकरीनिमित्त कॅबसेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कॅब ने प्रवास करणाऱ्यांकरिता आता दिलासादायक बातमी आहे. 1 मे 2025 पासून ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या लोकप्रिय कॅब सेवांसाठी सरकारने ठरवलेले निश्चित भाडे लागू होणार आहे. यामुळे दरवेळी बदलणारे अॅपमधील दर, अचानक वाढलेले भाडे आणि प्रवाशांचा गोंधळ यावर पूर्णविराम मिळणार आहे.
नवीन दर काय असणार?
- पहिल्या 1.5 किमी साठी: 37 रुपये
- त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी: 25 रुपये
- 10 किमी प्रवासाचे अंदाजित भाडे: 249.50 रुपये
आजघडीला याच अंतरासाठी साधारण 175 रुपये भाडे लागते. त्यामुळे थोडी वाढ झाली असली, तरी चालकांना स्थैर्य देणारा आणि प्रवाशांना पारदर्शक सेवा देणारा हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
काय आहे ‘OnlyMeter.in’?
नवीन प्रणालीचा भाग म्हणून, www.onlymeter.in ही वेबसाइट सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक कॅबमध्ये याचा QR कोड लावला जाईल. प्रवासानंतर फक्त QR स्कॅन करा आणि तुमच्या अंतरावर आधारित सरकारमान्य भाडे लगेच समजून घ्या. कोणताही गोंधळ नाही, फक्त स्पष्ट आणि विश्वासार्ह सेवा!
या निर्णयामुळे काय बदलणार ?
- दरवाढीवर नियंत्रण: प्रत्येक प्रवासासाठी निश्चित आणि पारदर्शक दर
- चालकांसाठी न्याय्य उत्पन्न: अॅपच्या बदलत्या दरांमुळे होणारे नुकसान थांबणार
- प्रवाशांना आधीच भाडे माहीत: अनपेक्षित वाढीचा त्रास टळणार
- कॅब क्षेत्रात पारदर्शकता आणि शिस्त: विश्वास आणि समाधान दोघांनाही
पुण्यात 45,000 हून अधिक कॅब्स सज्ज
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती परिसरातील हजारो कॅब्स 1 मेपासून या नव्या प्रणालीखाली कार्यरत होतील. यासंदर्भात व्यापक जनजागृती मोहीमही राबवली जाणार आहे, असे ‘इंडियन गिग वर्कर्स फ्रंट’चे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.