क्रिकेट खेळत खेळत त्यानं मारली UPSC मध्ये सेंच्युरी; सातारचा ओंकार बनला IAS ऑफिसर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण आपली आवड जप्त जप्त ध्येयही गाठण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करत असतो. क्रिकेट खेळण्याचं प्रचंड प्रेम मात्र, मोठं होण्याचं स्वप्न बाळगलेल्या सातारा जिल्ह्यातील सनपाने गावातील ओंकार मधुकर पवार याने आपलं स्वप्न पूर्णत्वास उतरवलंय. क्रिकेट खेळत खेळत ओंकारने UPSC परीक्षेत आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं आहे. ओंकार पवार यांचा आयएएस होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ओंकारने एक नाही तर दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली असून त्याने आता IAS परीक्षेत यश मिळवलं आहे. पाहूया त्याचा प्रेरणादायी प्रवास….

जावळी तालुक्यातील सनपाने गावचा सुपुत्र ओंकार मधुकर पवार याने युपीएससीमध्ये देशात 194 वा रँक मिळवून आयएएस व्हायचं स्वप्न पूर्ण केले आहे. 2 वर्षांपूर्वी ओंकारची यूपीएससीमधून पॅरामिल्ट्री फोर्समध्ये अधिकारी, तर त्यानंतर त्याची आयपीएससाठी देखील निवड झाली होती. मात्र, त्यांनी पुढे परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपला निर्णय पूर्ण करत असताना त्याने आपल्या आवडीकडे दुर्लक्ष केले नाही. तो दररोज न चुकता क्रिकेटच्या मैदानावर जाऊन क्रिकेट खेळायचा. आणि एक दिवस त्यानं क्रिकेट खेळत खेळत थेट सेंचुरीच मारली.

क्रिकेटची खूप आवड असलेल्या म्हणजे एक उत्तम क्रिकेटर असलेल्या ओंकार यांनी आपल्या सोशल मीडियावर त्यांनी असाच एक भन्नाट किस्सा शेअर केला. ओंकार यांच्या आईला ओंकारनं बीडीओ व्हावं असं वाटायचं असे त्याने म्हंटल आहे. आणि आईचे स्वप्न हे ओंकारने पूर्ण केले मात्र, त्या स्वप्नाच्या पलीकडे जाऊन त्याने आता उंच भरारी घेतली आहे.

यशामध्ये आहे आजीच्या पुण्याईचा खारीचा वाटा

आपल्याला परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल कुणाचा वाटा आहे? याबद्दल ओंकारने म्हंटले आहे की, माझी आजी आज 81 वर्षाची आहे. तिने शाळेची पायरी पण चढली नाही. आजीचा मी सगळ्यात लाडका. तिला असे कायम वाटत की मी तिच्या जवळच राहावं. मी दूर गेलो की तिला टेन्शन येतं. आमचे बऱ्यापैकी नातेवाईक मुंबईमध्ये असल्यामुळे मुंबई तिला सुरक्षित वाटायची म्हणून जेव्हा जेव्हा मी UPSC इंटरव्ह्यूला जायचो. तेव्हा तिला हे सांगून जायचो की दिल्ली जास्त लांब नाही, मुंबईच्या पुढेच आहे. त्यामुळे मी लांब जातच नाही. त्यामुळे कदाचित तिच्या पुण्याईने मला महाराष्ट्र कॅडरच मिळालं.

आईला वाटायचं पोरानं बीडीओ व्हावं?

ओंकारने आपल्या आईच्या आठवणी सांगितल्या आहेत. ते म्हणतो की, मी जेंव्हा स्पर्धा परीक्षा करायचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या आईला का कुणास ठाऊक पण मी BDO व्हावं असं वाटतं होतं. तिला त्यांचं काम काय असते याची पण काही कल्पना नव्हती. 1994 साली आमच्या घरच्यांनी दुसऱ्याचे शेत करायला घेतले होते. तो व्यक्ती BDO होता. तिने बघितलेले ते सर्वात उच्च सरकारी अधिकारी होते. त्या काळात त्यांचा रुबाब बघून सगळेच हरखून जायचे. माझी आई पण त्याला अपवाद नव्हती. ग्रामीण भागात लोकांना सरकारी नोकरी म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. म्हणून मग ज्या दिवशी माझा IAS चा निकाल लागला, तेव्हा मी आईला हेच सांगितले की हे BDO सारखंच काम असतं, असे ओंकारने म्हंटल आहे.

यशाच्या प्रवासात गावकऱ्यांची मोलाची साथ

आपल्या यशाबद्दल ओंकार म्हणतो की, मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. गावातली लोकं साधी भोळी असतात. माझ्या प्रवासात गावकऱ्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझा जन्म शहरात झाला असता तर कदाचित ह्या गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या नसत्या. मी जे काही आहे त्यात माझ्या कुटुंबाचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांच्या शिवाय हे सगळे शक्यच नव्हतं, असंही ओंकार पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.