नवी दिल्ली वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी आपात्कालीन सहाय्यासाठी जारी केलेल्या व्हॉट्सॲप 112 या क्रमांकावर मेसेज पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. ज्या क्रमांकावरून धमकी आली होती त्याबाबत तपास सुरू आहे आणि आरोपीचा शोध घेतला जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 29 एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपत्कालीन सेवांसाठी असणाऱ्या 112 या व्हाट्सअप क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. या धमकी मध्ये असं म्हटलं होतं की मुख्यमंत्र्यांकडे केवळ चार दिवस शिल्लक आहेत या दिवसात ‘माझं काय करायचं ते करा पाचव्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा जीव घेतला जाईल’. असे नमूद करण्यात आले आहे. या धमकीमुळे मात्र पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणा सतर्क झाले आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मिळालेली ही पहिली धमकी नव्हे. यापूर्वी देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहे. अशाप्रकारे थेट मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्या या क्रमांकाची तपासणी करण्यासाठी सर्व टीम तयार करण्यात आली आहे. लखनऊ च्या सुशांत गोल्फ सिटी मध्ये कंट्रोल रूम डायल 112 चे ऑपरेशन कमांडर अंजु कुमार यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सहा आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस पथक तयार करण्यात आले आहेत. पोलिसांचे पथक सर्व टीमच्या मदतीने आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. दरम्यान यापूर्वी योगी आदित्यनाथ यांना धमकी मिळाली होती या प्रकरणी एका मनोरुग्ण व्यक्तीला अटक करण्यात आली होती.