Tulja Bhavani : छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानीचा इतिहास जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Navratri 2023 । तुळजापुरची भवानी माता ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाते. डोंगराच्या सानिध्यात दरीत वसलेल्या या शक्तिपीठाची महाराष्ट्रात सर्वदूर ख्याती पसरली आहे. ‘भव’ म्हणजे शंकर त्याची पत्नी भवानी. शंकराची जी इच्छा-ज्ञान-क्रियारूप शक्ती, तिलाच शिवाची पत्नी मानून शैव आणि तंत्र सिद्धांतात दोघांचा अभेद दाखविला आहे. ही शक्ती शंकराप्रमाणेच सगुण आणि निर्गुण रूपांत प्रादुर्भूत होते. सगुण रूपाने ती सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय ही कामे करीत असते, तर निर्गुण रूपात ती चिदामदरूपात रहाते. या दोन्ही रूपांचे वर्णन तंत्रशास्त्रात सर्वत्र पहावयास मिळते.

संस्कृतातील सौंदर्य लहरी, ललिता सहस्रनाम, देवी भागवत, भवानी भुजंगम स्तोत्र इ. ग्रंथांत शक्तिरूपिणी देवीची म्हणजे भवानीची अनेक कार्ये वर्णिली आहेत. तिने आपल्या शक्तीला आवश्यकतेनुसार सात्विक, राजस व तामस रूपांत प्रकट करवून भक्तांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन केले आहे. देवी, महादेवी, ललिता, पार्वती, त्रिपुरसुंदरी या जशा सामान्य संज्ञा आहेत, तशाच महिषासुरमर्दिनी, दुर्गा, चंडी, भुवनेश्वरी या विशेष संज्ञा कार्यभेदामुळे देवीला प्राप्त झाल्या आहेत. ललिता सहस्रनामात ‘भवानी भावनागम्या भवारण्यकुठारिका’ असे तिचे वर्णन केले आहे. तंत्रशास्त्रातील अनेक सिद्धांत शिव-पार्वती संवादरूपानेच आले आहेत, म्हणजेच अनेक रूपे धारण करून विविध कार्ये करणारी शिवशक्ती हीच देवी किंवा भवानी आहे.

वेदान्तातील ब्रह्म-मायाच तंत्रग्रंथांत शिव-पार्वती किंवा भव-भवानी होते. ‘भव’ शब्दाचे जल, महादेव, मदन, संसार असेही अर्थ आहेत. त्या सर्वाना चैतन्य देणारी देवी ती भवानी, असे स्पष्टीकरण भास्कररायांसारख्या काही तंत्रविदांनी केले आहे. ‘भवानी’ ही ठाणेश्वर वा स्थानेश्वर अथवा थानेसर (पंजाब) येथील शक्तिपीठाची अधिष्ठात्री देवता आहे. महाराष्ट्रातील तुळजापूर (जि. उस्मानाबाद) हे भवानीचे प्रख्यात असे क्षेत्र असून येथील तुळजाभवानी अनेकांचे कुलदैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचीही तुळजाभवानी कुलस्वामिनी होती. भवानी तलवार त्यांना साक्षात तुळजाभवानीनेच दिली होती, अशी आख्यायिका आहे.

लेखक- प्रतीक पुरी