एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी कार्यक्रम होऊ शकतो; जयंत पाटलांचं विधान चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवारांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा नेहमीच सुरु असतात. अधून मधून या वावड्या उठत असतात. यामुळे जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत आहे. मात्र याच दरम्यान, या सर्व चर्चावर भाष्य करताना जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे. एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी कार्यक्रमही होऊ शकतो, पण शरद पवारांची साथ सोडणार नाही असं म्हणत जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत जयंत पाटील बोलत (Jayant Patil Speech In Niphad) होते. त्यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात अस्थिर असणाऱ्या भाजपला पश्चिम महाराष्ट्रातील आपले संघटन मजबूत करायचे आहे. म्हणून भाजपचे नेते आपल्याभोवती जाळे फेकत आहेत. एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी कार्यक्रमही होऊ शकतो. परंतु ज्यांनी आपले राजकीय जीवन फुलवले आहे, अशा शरद पवारांसाठी आपण कोणताही त्याग करायला तयार आहोत, असं म्हणत आपण कायम शरद पवार यांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार साहेबांवर प्रेम करणारा जिल्हा म्हणून नाशिक जिल्हा ओळखला जातो. त्यामुळे नाशिकमध्ये आपले ५ आमदार मागच्या निवडणुकीत जिंकून आले असं जयंत पाटील म्हणाले. यावेळी आपल्या भाषणात जयंत पाटील यांनी सरकार वर जोरदार टीका केली. राज्यात उद्घटनांची रीघ लागली आहे. कोट्यावधी रुपयांचे निर्णय घेतले जात आहेत. जणूकाही हे पैसे आपल्याला द्यायचेच नाहीत, फक्त जाहीर करायचे आहेत ही भावना आहे. महाराष्ट्रातला निकाल वेगळा लागेल या धास्तीने तिजोरीत असेल तेवढं द्या ही भूमिका घेतली आहे. आता अब की बार 400 पार ची घोषणा आहे. यांनी एकदा का हा आकडा गाठला की संविधानाला धक्का लावण्याचे काम सुरू होणार का? ही भीती आहे. आम्हाला तुमच्या घोषणांची खैरात नको आमच्या शेतकऱ्याला आधारभूत किंमत द्या असं जयंत पाटील यांनी म्हंटल.