कांद्याच्या दरात 2000 रुपयांची घसरण; बळीराजा चिंतेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही महिन्यापासून कांद्याचे दर गगनाला भिडले होते. पण या 15 दिवसांत कांद्याच्या दरात तब्बल 1500 ते 2000 रुपयांची घसरण दिसून आली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले आहेत. याआधी कांद्याला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी बक्कळ नफा मिळवला होता. पण या घसरणीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. हि परिस्थिती निर्माण होण्यामागे काही कारणे आहेत ते आज आपण पाहणार आहोत.

कांद्याच्या दरात मोठी घसरण –

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत सध्या कांद्याला सरासरी 1900 रुपये दर मिळत आहे, तर जास्तीत जास्त दर 2800 रुपयांवर स्थिरावला आहे. तसेच काही आठवड्यांपूर्वी कांद्याचे दर 5000 ते 6000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. किरकोळ बाजारात कांदा 60 ते 80 रुपये प्रतिकिलो विकला जात होता. पण अचानक दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत.

कांद्याचे दर कमी होण्याची कारणे –

कांद्याचे दर अचानक घसरण्याची अनेक कारणे समोर आली आहेत. त्यामध्ये देशांतर्गत बाजारात वाढलेली कांद्याची मोठ्या प्रमाणातील आवक हे एक महत्वाचे कारण आहे. त्याचसोबत केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेले 20% निर्यात शुल्कदेखील मोठा अडथळा ठरत आहे. निर्यात अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील मागणीचा फायदा मिळत नाही. त्यामुळे याचा परिमाण कांद्याच्या दरावर दिसून येत आहे.

शेतकऱ्यांची मागणी –

शेतकरी संघटनांनी कांद्यावरील निर्यात शुल्क तातडीने हटवण्याची मागणी केली आहे. यामुळे कांद्याला परदेशी बाजारपेठ मिळून दर सुधारतील, नाहीतर शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. यासाठी सरकारने निर्यात शुल्काचा फेरविचार करून कांद्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.