हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सायबर फसवणूक मोठ्या प्रमाणावर वाढली असून, या फसवणुकीमध्ये तुम्हाला अचानक व्हाट्सअँपवर लॉटरी जिंकल्याचे मेसेज अथवा फोन येतात . त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा अनोळखी अँप डाऊनलोड करण्यासाठी सांगितले जाते . ज्यामुळे तुमच्या बँक खात्यातून काही क्षणातच पैसे गायब केले जातात. अशा प्रकारच्या घटना वारंवार झाल्या असून , अनेक लोक यामुळे कंगाल झाले आहेत. म्हणून अशा घटनांपासून सावध राहण्याची गरज आहे. यासाठी आम्ही तुम्हाला काही मार्ग सांगणार आहोत , ज्यामुळे तुम्ही फसवणुकीपासून सुरक्षित राहू शकता .
काही टक्क्यांचे आमिष दाखवून फसवणूक –
आजच्या घडीला बघता लोकांची शेअर बाजारातील गुंतवणूक वाढली असून , अनेकांचा कल त्याबाजूला असल्याचे दिसून येतो . याचाच फायदा गुन्हेगारांनी घेतला असून , त्यांनी अनेक फसवे शेअर बाजार प्लॅटफॉर्म सुरू केले आहेत. ते तुम्हाला काही टक्क्यांचे आमिष देऊन टेलिग्राम ग्रुप्सवर गुंतवणूक करवून घेतात . पण जेव्हा पैसे काढण्याची वेळ येते तेव्हा समजते कि हि सगळी फसवणूक होती . तसेच सोशल मीडियावर देखील बनावट शेअर बाजार प्लॅटफॉर्मची जाहिरात केली जात आहे. अशा प्लॅटफॉर्मवरील रिव्ह्यूज, प्रायव्हसी पॉलिसी आणि अटी व नियम यांची पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
क्रेडिट कार्डवरील फसवणूक –
क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी हॅकर्स वेगळे कॉल्स करून तुमच्या खात्याची माहिती घेत आहेत. क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी फोन करून तुमच्याशी संपर्क साधून, तुमच्या कार्डची माहिती घेतात आणि नंतर खात्यातून रक्कम गायब करून फरार होतात. त्याचबरोबर सार्वजनिक बँक व्यवहारातदेखील सायबर गुन्हेगारांनी नवीन फसवणूक प्रकार सुरू केले आहेत. तुमच्या खात्यात चुकून रक्कम आल्याचा दावा करून, त्या रकमेचा हडप करण्यासाठी तुमच्या खात्याची माहिती घेतली जाते आणि त्याद्वारे तुमची फसवणूक केली जाते.
फसवणूक होण्यापासून बाळगा दक्षता –
कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. APK सारख्या फाइल ओपन केल्यास तुमचा फोन हॅक होऊ शकतो. वेगळ्या कॉल्सची तपासणी करून मग त्यांच्याशी बोला. तसेच तुमची वैयक्तिक माहिती मागणारे कॉल्स किंवा ई-मेल्सकडे दुर्लक्ष करा . तुम्ही कुरियर करत असलेल्या मौल्यवान वस्तू पाठवणे टाळा. अशा फसवणुकीला तुम्ही बळी पडल्यास लगेच cybercrime.gov.in या वेबसाइटवर तक्रार करा. फसवणूक होऊ नये यासाठी आपल्या डिजिटल सुरक्षिततेची काळजी घ्या आणि आपल्या बँक खात्याची कोणतीही माहिती कोणालाही शेअर करू नका. हि दक्षता पाळल्यास तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकता .