Sunday, May 28, 2023

अदानी प्रकरणावरून विरोधकांचा ED कार्यालयावर मोर्चा; पोलिसांनी मध्येच रोखला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशभर गाजत असलेल्या अदानी प्रकरणी विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फत चौकशीची मागणी करत, जवळपास 16 पक्षांच्या विरोधी खासदारांनी संसद भवन ते अंमलबजावणी संचालनालय (ED) कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना मध्येच रोखले.

अदानी ग्रुपवरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. यासाठी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आणि खासदारांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संसद भवनातून बाहेर पडताच दिल्ली पोलिसांनी त्यांना विजय चौकात रोखले. यावेळी 200 खासदारांना रोखण्यासाठी 2000 पोलीस तैनात करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

या मोर्चामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर राजन चौधरी, सीपीआयचे बिनॉय विश्वम, सीपीएमचे एलामाराम करीम, डीएमकेचे टीआर बालू, समाजवादी पक्षाचे रामगोपाल सिंह, आम आदमी पक्षाचे संजय सिंग यादव, शिवसेनेचे संजय राऊत आणि बीआरएसचे केशवराव यांचा समावेश होता. मात्र राष्टवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने या मोर्चामध्ये भाग न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.