वडिलांना सायकल वरून बिहार घेऊन जाणारी ज्योती देणार महासंघाची ट्रायल; देशाला मिळणार नवीन खेळाडू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनच्या काळात विविध रंजक कथा ऐकायला मिळत आहेत. विविध राज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित मजूर बरेच त्रास सहन करत आपापल्या गावाकडे परत जात आहेत. अशीच एक ज्योती आहे जी तिच्या जखमी बापाला सायकलवर घेऊन गुरुग्रामहून थेट दरभंगाला पोहोचली. इतका लांबचा प्रवास केलेल्या या ज्योतीसाठी अखिलेश यादव यांनी लगेच १ लाखांची मदत जाहीर केली आहे, तर आता सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाकडूनही तिला ट्रायलची संधी देण्यात आलेली आहे. महासंघाचे संचालक व्ही. एन. सिंह यांनी ज्योतीचे वर्णन करताना सांगितले की,’ महासंघ तिला ट्रायल देण्याची संधी देईल आणि सीएफआयच्या मानदंडांमध्ये ती थोडी जरी खरी ठरली तर तिला विशेष ट्रेनिंग आणि कोचिंग दिले जाईल.

मीडिया रिपोर्टनुसार ज्योती या लॉकडाउनमध्ये तिचे वडील मोहसन पासवान यांना घेऊन सायकलवरून आपल्या गावाला जाण्यासाठी निघाली. तिने गुरुग्रामहून बिहारच्या दरभंगाला जाण्यासाठी आठ दिवसांत एक हजार किमीपेक्षा जास्तीचा प्रवास केला आहे. यावेळी ज्योती दररोज १०० ते १५० किलोमीटर सायकल चालवत होती.

व्ही.एन. सिंह म्हणाले की,’ आम्ही नेहमीच अशा प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेत असतो आणि जर या मुलीमध्ये अशी क्षमता असेल तर आम्ही तिला नक्कीच संधी देऊ. तसेच तिला पुढे ट्रेनिंग आणि कोचिंगसाठी शिबिरात दाखल करता येईल. मात्र, त्यापूर्वी आम्ही तिची क्षमता पारखू. जर ती आमच्या निकषांची पूर्तता करत असेल तर आम्ही तिला पूर्ण मदत करू. तिला परदेशातून आयात केलेल्या सायकलींवर ट्रेनिंग दिले जाईल.

लॉकडाऊननंतर ज्योतीला ट्रायलची संधी देण्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की,’ मी तिच्याशी बोललो आहे आणि मी तिला सांगितले की,’ लॉकडाउन संपल्यानंतर जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा तू दिल्लीला ये. यावेळी इंदिरा गांधी स्टेडियमवर आम्ही तिची थोडी टेस्ट घेऊ. आमच्याकडे वॅटबाईक आहेत ज्या स्थिर बाईक आहेत. यावर खेळाडूला चार ते पाच मिनिटे बसवून टेस्ट केली जाते. यामध्ये खेळाडू आणि त्यांच्या पायाची क्षमता किती आहे हे या टेस्ट मधून कळते. ती इतक्या लांबपर्यंत सायकल चालवत आली आहे म्हणजेच तिच्यात नक्कीच क्षमता आहे.’

व्ही.एन. सिंह यांनी कबूल केले की,’ एका १५ वर्षाच्या मुलीसाठी दिवसाला १०० किमीपेक्षा जास्त सायकल चालवणे हे सोपे काम नाही. मी सध्या मीडियामधील बातमीच्या आधारे बोलत आहे, परंतु जर तिने खरोखरच तसे केले असेल तर ती खूपच सक्षम आहे.’

यावेळी ज्योती म्हणाली की,’सायकलिंग फेडरेशनकडून मला फोन आला होता आणि त्यांनी मला ट्रायलबद्दल सांगितले. मी आता खूप थकले आहे पण लॉकडाउननंतर जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच या टेस्टमध्ये सहभागी होऊ इच्छिते. जर मी यशस्वी ठरले तर मला सायकलिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायला आवडेल तसेच संधी मिळाली तर मला पुन्हा अभ्यास करायचा आहे असेही तिने सांगितले आहे.

ज्योतीचे वडील गुरुग्राम येथे रिक्षा चालवत होते. त्यांच्या अपघातानंतर ज्योती आपल्या आई व दाजींबरोबर गुरुग्राम येथे आली आणि नंतर वडिलांची देखभाल करण्यासाठी तिथेच राहिली. दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि ज्योतीच्या वडिलांचे काम बंद झाले. अशा परिस्थितीत ज्योतीने आपल्या वडिलांसोबत सायकलवरूनच परत गावी जाण्याचा निर्णय घेतला. आता क्वारंटाईनमध्ये घरातच वेळ घालविणारी ज्योती म्हणाली की,’तिला संधी मिळाली तर ती ट्रायलसाठी तयार आहे.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment