Sunday, December 14, 2025
Home Blog Page 6722

भारतासाठी रुपेरी रक्षाबंधन

asian games
asian games

रविवारच्या ४ रजत पदकांसह एकूण ३६ पदके मिळवत पदकतालिकेत भारत ९ व्या स्थानी

जकार्ता | आशियाई क्रीडा स्पर्धेतील रविवारचा दिवस भारतासाठी रुपेरी ठरला. हिमा दासने महिलांच्या ४०० मी. शर्यतीमध्ये ‘रौप्य’ पदक जिंकून देशाची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. तिने ५०.७९ सेकंदात ही शर्यत पार केली. १८ वर्षीय हिमाची ही पहिलीच आशियाई स्पर्धा होती. यापूर्वी तिने २०१८ मध्ये फिनलँडमध्ये झालेल्या वर्ल्ड ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठीच्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवलं होते. त्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती पहिली भारतीय ठरली होती. पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीतही मुहम्मद अनासने ४५.६९ सेकंद अशी वेळ नोंदवत रजत पदकाची कमाई केली. द्युती चंद हिने १०० मीटर शर्यतीत रजत पदक मिळवले. तिने ११.३२ सेकंदांची वेळ नोंदवली. तर फवाद मिर्झा व संघाने अश्वारोहणात रजत पदकाची कमाई केली. १९८३ नंतर प्रथमच भारताने अशा वेगळ्या क्रीडाप्रकारात पदक मिळवले आहे. दरम्यान भारताच्या दोन्ही फुलराण्या, सायना नेहवाल व पी.व्ही.सिंधू बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचल्या आहेत. त्यामुळे आणखी २ पदकांची निश्चिती झाली आहे.

केरळ डायरी – भाग १

cyda
cyda

– विश्वभूषण करूणा महेश लिमये

उषः काल होता होता काळराञ झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

केरळी नागरिक, एका नव्या आजच्या शोधात..

केरळमध्ये पूरसदृश स्थिती झाली आहे आणि आपला बांधव अडचणीत आहे,
हे समजातक्षणी आपण ही आपल्या परीने मैदानात उतरायला पाहिजे याची खूनगाठ मनाशी बांधली होती१५ अॉगस्टच्या सकाळी सुभाष वारे सरांकडून १९९३ च्या किल्लारी भूकंपातील काही गोष्टींवर गप्पांच्या माध्यमातून प्रकाश टाकला आणि त्यावेळेस “युवा दक्षता समिती”च्या माध्यमातून त्यांनी काय कार्य केले होते याचा अनुभव माझा मिञ मयूर डुमने याने माझ्यासमोर मांडला व या सर्वांवर एखाद पुस्तक लिहिण्याची इच्छा व्यक्त केली. हा किस्सा येथे मुद्दामहून सांगतोय कारण की, समाजासाठी स्वतःला वाहून घेणारी माणसं आज सुध्दा आपणामध्ये आहेत आणि ते आमच्या सारख्या युवकांसाठी प्रेरणादायक ठरतात.
त्याचबरोबर १९९३ ला जो भूकंप झाला,
त्याच परिसरातून मी येत असल्या कारणाने केरळवासीयांबरोबर एक भावनिक किनार जोडलेली होती. त्यामध्येच आमच्या मुरूमकरवासीयांनी फुलं ना फुलाची पाकळी म्हणून २४००० रूपयांची मदत केरळच्या बांधवांसाठी केली.
त्यामुळे या कामासाठी मला अधिकच बळ मिळालं.

CYDA टीमसोबत चर्चा करताना स्थानिक

माझा रानडे इन्स्टिट्यूटमधील मित्र योगेश जगताप याच्या माध्यमातून ‘CYDA – Center for Youth Development Activities’ या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क आला व मॕथ्यू मथम यांच्या मार्गदर्शनाखाली आमची १५ लोकांची टीम केरळला येऊन पोंहचली. यामध्ये आम्ही तीन गोष्टींवर लक्ष द्यायच ठरवलं,

मानसिक आधार,स्वच्छता आणि आरोग्य

◆ इथला बांधव जो मानसिकदृष्ट्या खचला आहे त्याला, आम्ही तुझ्यासोबत आहोत म्हणून आधार द्यायच काम आज केलं,
हे करत असताना भाषेची अडचण आलीच परंतू एका विशिष्ट टप्प्याला भाषेपेक्षा भावना जवळच्या वाटतात आणि यांनी आम्हां सर्वांना तितकेच आपलेपणाने जवळ घेतलं हे सांगाव लागेलं,

◆ दुसरा मुद्दा स्वच्छतेचा..आम्ही १३ लोकांच्या घरची स्वच्छता केली. त्यामध्ये बहुतांश कुटुंबात वयोवृध्द आणि लहान मुलं असल्याकारणाने त्यांना ही काम जमत नव्हती. परंतू इथल्या ज्या कुटुंबात तरूण मुलं आहेत, तेथील परिवारांनी स्वतःहून स्वच्छता केली व आम्ही आपलेपणाने त्यांची मदत करण्यासाठी पुण्याहून आलोय म्हणून आमचं आदरातिथ्य केलं. आणखी एक गोष्ट इथला माणूस किती स्वावलंबी,शिस्तबद्ध, चिकाटीने युक्त व स्वच्छताप्रिय आहे हे सुध्दा समजले. बाकी सर्वधर्मसमभावच्या गप्पांच गुऱ्हाळ आपल्याइकडे खूप चालतं परंतु इथे खऱ्या अर्थाने आम्हाला तो जगता आला.
हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन सर्वच बांधव आज आमच्यासाठी तितकीच जवळची होती. आम्हाला प्रत्येकाच्या घरात जायला मिळालं. माणूसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे याची प्रत्यक्ष प्रचिती आली. ज्यांच्यासाठी आम्ही काम करू शकलो त्याच्या चेहऱ्यावरील स्मितहस्य आम्हाला कुठे तरी केलेल्या कामाची पोहचपावती देत होतं, आम्ही केलेल्या कामानंतर इथल्या प्रत्येक नागरिकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कित्येक पटीमध्ये सकारात्मक आहे, हे पावलोपावली जाणवत होतं.

◆ आमचा तिसरा मुद्दा हा आरोग्यासंदर्भातला आहे, तर रविवारी या ठिकाणी एक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे.
तर त्यामध्ये ही आमचा सहभाग असणार आहे. त्याचबरोबर येथील प्रशासकीय अधिकारी, पंचायत समिती सदस्य,सभापती यांना जराही अभिमान वा गर्व नाही.अगदी जमिनीशी जोडलेली ही माणसं आमच्यासोबत पडेल ती काम करत आहेत.
यांच्याकडून आपल्या नेते आणि अधिकाऱ्यांनी खूप शिकायला पाहिजे,
असो आम्ही आत्ता कुठं सुरूवात केली आहे. आणखी भरपूर काम बाकी आहे.

विंदांनी म्हटल्याप्रमाणे

देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेणाऱ्याने घेता घेता
एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे”

काम चालू असतानाची कृतज्ञ भावमुद्रा

त्यामुळे करत राहायच आहे, बस्स करतच रहायचय आपल्या माणसांसाठी….(क्रमशः)

(विश्वभूषण हा पत्रकारितेचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी असून, CYDA ही पुणे स्टेशन परिसरात असणारी, युवांच्या संदर्भात काम करणारी संस्था आहे. संपर्क – मॅथ्यू मथम सर, cyda – 9179084484 , विश्वभूषण – 7722067193)

‘झेडपी’च्या शाळा दर्जेदार करणासाठी १० कोटींची तरतूद – चंद्रकांत पाटील

chandrakant patil
chandrakant patil

कोल्हापुर | कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत गुणवंत विद्यार्थी गुणगौरव, लॅपटॉप वितरण आणि ई-लर्निंग सॉप्टवेअर वितरण समारंभ आज स्वामी विवेकानंद कॉलेजच्या डॉ. बापुजी साळुंखे स्मृती भवन सभागृहात पार पडला.

यावेळी महसुल मंत्री पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा अधिक दर्जेदार आणि गुणवत्ता प्रदान बनविण्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद जिल्हा नियोजन समितीतून करण्यात येईल अशी घोषणा केली. जिल्हा परिषदेच्या शाळा प्रयोगशील आणि अद्ययावत करण्यास शासनाने भर दिला असून, शिक्षणाबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रयोगावर अधारित शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. यामुळे मुलांची प्रयोगशिलता आणि संशोधनवृत्ती वाढण्यास यामुळे मदत होणार आहे.
यापुढील काळात जिल्ह्यातील ४०० शाळांमध्ये हा उपक्रम राबवून मुलांची गुणवत्ता वाढविण्यास भर दिला जाणार आहे. येत्या वर्षभरात जिल्ह्यातील सर्व वर्गात ई-लर्निंग सुविधा जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत उपलब्ध करुन दिली जाईल असेही महसुल मंत्री पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला सुरेश हाळवणकर, ‘झेडपी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शिक्षण सभापती अंबरिषसिंह घाटगे, समाज कल्याण सभापती विशांत महापुरे, महिला व बाल कल्याण सभापती वंदना मगदुम आदी उपस्थित होते.

अनिल अंबानींकडून काँग्रेसच्या वृत्तपत्रावर ५००० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा

anil ambani
anil ambani

मुंबई | अमित येवले

राफेल विमानाच्या खरेदीबाबत रिलायन्सने स्वतःच्या हितसंबंधांसाठी विमान खरेदी लांबणीवर टाकल्याचं विधान नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राने केलं होतं. हे विधान आता त्यांना महागात पडणार असं दिसतंय. काँग्रेसच्या निधीवर चालणाऱ्या या वृत्तपत्रावर अनिल अंबानी यांनी ५००० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा टाकला आहे. शहानिशा न करता एकांगी पद्धतीने बातमी दिल्याचा ठपका नॅशनल हेराल्डवर ठेवण्यात आला आहे. याशिवाय आणखी ५००० कोटींचा दावा काँग्रेसच्याच शक्तीसिंग गोहिल यांच्यावर दाखल केला आहे. दरम्यान रिलायन्स उद्योग समूहाच्या नाविक व अभियांत्रिकी प्रमुखपदावरून अनिल अंबानी आज पायउतार झाले आहेत.

७० वर्षांपूर्वीचा आरके स्टुडिओ आता विक्रीस

rk studio
rk studio

मुंबई | अमित येवले

२०१७ मध्ये मुंबईतील भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला आरके स्टुडिओ विक्रीस काढला असल्याची घोषणा ऋषी कपूर यांनी आज केली. आगीमुळे प्रचंड नुकसान झालेलं असतानासुद्धा कपुर कुटुंबीयांनी मागील वर्षभरात खुप सारा खर्च या वास्तुसाठी केला होता. सध्या खर्च अतिरिक्त होत असल्यानेच आम्ही हा स्टुडिओ विकत असल्याचं ऋषी कपूर यांनी सांगितलं. आम्हालाही काळजावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागत असल्याचेही ऋषी कपूर म्हणाले. १९४८ साली राज कपूर यांनी या स्टुडीओची स्थापना केली होती. अनेक चांगल्या चित्रपटांचं चित्रीकरण या स्टुडिओने अनुभवलं आहे. आता या स्टुडीओची पुढील वाटचाल कशी असेल हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

सलमान-कॅटरिनाचा ‘भारत’ चित्रपटातील पहिला लुक व्हायरल

bharat movie
bharat movie

चित्रपटनगरी | राहुल दळवी

‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ म्हणत एकमेकांसोबत येणाऱ्या सलमान खान व कॅटरिना कैफ यांचा भारत या नवीन चित्रपटातील लूक व्हायरल झाला आहे. सलमानची रुबाबदार मिशी व कॅटरिनाचे कुरळे केस हे चित्राचे आकर्षण ठरत आहेत. अत्यंत रोमँटिक असा हा लुक प्रेक्षकांना भावला आहे. अली अब्बास जाफर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून २०१९ च्या ईदला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. कोरियन चित्रपट Ode to My Father वरुन या चित्रपटाची संकल्पना घेतली आहे.

संपूर्ण भारत केरळच्या सोबतीला आहे – नरेंद्र मोदी

modi man ki baat
modi man ki baat

मन की बात मधून अटलबिहारी वाजपेयी यांनाही श्रद्धांजली

रेडिओ कॉलिंग | सुरज शेंडगे

‘मन की बात’ या महिन्यातील शेवटच्या रविवारी चालणाऱ्या महत्वपुर्ण रेडिओ कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी केरळ पुरग्रस्तांविषयी सहानुभूती व्यक्त केली. प्रत्येक भारतीय केरळवासीयांसाठी खांद्याला खांदा देऊन काम करतोय. संरक्षणसिद्ध असणाऱ्या आर्मी, नेव्ही, बीएसएफ, एनडीआरएफ, सीआयएसएफ यांनी या आपत्तीप्रसंगी लोकांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो असंही मोदी म्हणाले. आजच्या ४७ व्या भागात मोदींनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय कारकीर्दीवर सुद्धा प्रकाश टाकला. भारताला उत्तम प्रशासन आणि सकारात्मक, प्रवाही राजकारणाची वाट वाजपेयी यांनी दाखविली. संसदेत अर्थसंकल्प वेगळ्या वेळेत सादर करण्याची, केंद्र मंत्रिमंडळ राज्य मंत्रीमंडळापेक्षा १५% कमी करण्याची अनोखी संकल्पनाही वाजपेयींनी दिल्याची आठवण मोदींनी काढली.

आपण माणूस असणं महत्वाचं – गौतम गंभीर

gambhir
gambhir

तृतीयपंथीयासोबत साजरा केला रक्षाबंधन

दिल्ली | आपण पुरुष आहोत की स्त्री हे महत्वाच नाही, आपण माणूस असणं गरजेचं आहे असं मत व्यक्त भारताचा फलंदाज गौतम गंभीर याने व्यक्त केलं. अभिना आहेर आणि सिमरन शेख या दोन तृतीयपंथीयांकडून राखी बांधल्यानंतर गौतमने आपल्या भावना व्यक्त केल्या. मी त्यांना आहे तसं स्वीकारलं आहे आणि तुम्ही? हा प्रश्नही त्यांनी ट्विटरद्वारे तमाम नेटिझन्स ला विचारला.

गौतम गंभीर रक्षाबंधन वेळी ट्विट करताना

अथलेटिक्समध्ये तजिंदर पाल सिंगच्या रुपात भारताला पहिलं सुवर्ण

tajindar pal singh
tajindar pal singh

दीपिका कुमारी, ज्योत्स्ना चिनाप्पा आणि सौरव घोषाल यांना कांस्यपदक

जकार्ता | येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत तजिंदर पाल सिंग याने गोळाफेक क्रीडा प्रकारात २०.७५ मीटर फेक करुन सुवर्णपदकाची कमाई केली. अथलेटिक्स मधील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. याआधी दिवसभरात दीपिका पल्लीकल आणि ज्योत्स्ना चिनाप्पा यांनी स्क्वॅश क्रीडाप्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. मलेशियाच्या निकोल ऍन डेव्हिडने दीपिकाला तर त्याच देशाच्या शिवसंगरी सुब्रह्मण्यमने ज्योत्स्नाला पराभवाचा धक्का दिला. सौरव घोषाललासुद्धा उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आतापर्यंत भारताच्या खात्यावर ७ सुवर्ण, ५ रौप्य व १७ कांस्यपदक जमा झाली आहेत. ७२ सुवर्णपदकांसह एकूण १५३ पदके मिळवत चीन पहिल्या स्थानावर आहे.

पदकांची आशा – ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मोहम्मद अनासने उपांत्य फेरी गाठली आहे. याशिवाय पीव्ही सिंधू व साईना नेहवाल यांनीही बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.

स्त्रीलंपट चोराला नागपुरात अटक

guilty
guilty

५ घटस्फोटित महिलांशी विवाह करून लाखो रुपयांना गंडवले

नागपूर | प्रतिनिधी

मेट्रीमोनिअल वेबसाईटवर खाते उघडून घटस्फोटीत महिलांना लग्नाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या
आकाश अग्रवाल उर्फ अजय कुंभारे याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. घटस्फोटित महिलांच्या एकटेपणाचा फायदा उचलून मेट्रीमोनिअल वेबसाईटच्या माध्यमातून अनेक महिलांच्या संपत्तीला या इसमाने चुना लावल्याचे नागपूर पोलिसांनी सांगितले आहे. आजपर्यंत याने पाच स्त्रियांशी लग्न करून त्यांची संपत्ती हडप केली आहे. मेट्रीमोनिअल वेबसाईट गडगंज स्त्रियांचा शोध घ्यायचा, त्यांच्या समोर खोटी श्रीमंती दाखवून आपल्याशी लग्न करण्यासाठी तयार करायचे,काही दिवस विश्वासात घ्यायचे आणि त्या स्त्रियांची विकता येईल अशी संपत्ती त्यांच्या परस्पर विकायची असा कृती कार्यक्रम पाचही स्त्रियांच्या बाबतीत राबवल्याची कबुली आरोपीने दिली आहे.वर्ध्याच्या एका महिलेचा २७ लाखाचा फ्लॅट आरोपीने तिच्या परस्पर विकून तो फरार झाला. हा प्रकार घडल्यानंतर या महिलेने पोलिसात तक्रार दिली त्यानंतर त्या व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी शोध मोहीम राबवली. आकाश अग्रवाल या आरोपीने पाच महिलांना एकत्रितपणे ५४लाखांना फसवल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.