हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pahalgam Terrorist Attack – पहलगाम येथील नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली होती. आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांनी परतीचा मार्ग धरला असून, श्रीनगर येथून विशेष विमानाच्या सहाय्याने आज काही पर्यटक महाराष्ट्रात परत येणार आहेत. या दहशतवादी हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने श्रीनगर गाठले. त्यांनी बुधवारी विविध प्रशासनिक यंत्रणांशी संपर्क साधून मदत आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्या.
दीड हजार मराठी पर्यटक (Pahalgam Terrorist Attack) –
मुंबई येथील मंत्रालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत काश्मीरमधील पर्यटकांची माहिती संकलित करण्यात येत आहे तसेच परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये सध्या सुमारे दीड हजार मराठी पर्यटक आहेत. सर्व पर्यटक श्रीनगर परिसरात सुरक्षित आहेत.
हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीनगरमध्ये बंद –
काल (23 एप्रिल) दहशतवादी हल्ल्याच्या (Pahalgam Terrorist Attack) निषेधार्थ श्रीनगरमध्ये बंद पाळण्यात आला होता, मात्र आजपासून हा बंद मागे घेण्यात आला आहे. श्रीनगरला जोडणारा मुघल रोड जो काल सकाळी बंद होता, तो आजपासून पुन्हा खुला करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे विमानसेवा सुरळीत सुरु ठेवण्यात येत असून, आज श्रीनगर येथून महाराष्ट्रासाठी एक विशेष विमान सोडण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पर्यटकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
मंत्री गिरीश महाजन श्रीनगरमध्येच थांबणार –
राज्याचे मुख्यमंत्री देखील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून, केंद्र व राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा सक्रिय आहेत. परिस्थिती पूर्णपणे पूर्ववत होईपर्यंत आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन श्रीनगरमध्येच थांबणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.




