जर पाणी थांबवलं, तर श्वास थांबवू ! भारताच्या निर्णयाने पाकची तडफड, हाफिज सईदचा व्हिडीओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसोबतची सिंधू जलसंधी तात्काळ प्रभावाने रद्द केल्याची घोषणा केली. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून, देशातील पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारताच्या ऐतिहासिक निर्णयामुळे पाकिस्तानची तडफड

१९६० साली भारत आणि पाकिस्तानमध्ये तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांच्या हस्ते सिंधू जलसंधीवर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. या करारानुसार भारताला रावी, व्यास आणि सतलज नद्यांचा वापराचा अधिकार दिला गेला होता, तर पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचा. मात्र, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने आता हा करार रद्द करत पाकिस्तानवर पाण्याचे नवे शस्त्र उपसले आहे.

भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक जलविद्युत प्रकल्प ठप्प होण्याची, शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर विपरित परिणाम होण्याची चिन्हं आहेत. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर ठरू शकते.

व्हायरल झाला व्हिडीओ

भारताच्या या निर्णायक पावल्यानंतर पाकिस्तानने आपली बौखलाट स्पष्ट केली आहे. पाकिस्तानने दहशतवादी हाफिज सईदच्या जुन्या व्हिडिओचा आधार घेत भारताला धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हाफिज सईद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताला उद्देशून म्हणतो, “जर तू पाकिस्तानचं पाणी थांबवलंस, तर आम्ही तुझे श्वास बंद करू. नद्यांमध्ये पाणी नव्हे, तर रक्त वाहेल.”

भारताची प्रतिक्रिया – “आता सहनशक्ती संपली आहे”

या धमक्यांनंतरही भारत सरकारने स्पष्ट केले आहे की, देशाच्या सुरक्षेबाबत कोणताही तडजोड केला जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या CCS (Cabinet Committee on Security) बैठकीत सिंधू जलसंधी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. संरक्षण मंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनीही या निर्णयाचे समर्थन केले आहे.

नागरिकांचा संताप आणि समर्थन

देशभरातून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. सोशल मीडियावर नागरिकांनी “पाणी बंद, आतंक बंद” अशा हॅशटॅगसह भारत सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. अनेकांनी म्हटले की, आता वेळ आली आहे की भारत आपल्या धोरणांमध्ये कठोरता दाखवेल आणि दहशतवादाला मूठमाती देईल.