पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात विश्वजीत कदमांना नडणाऱ्या देशमुखांची ताकद किती?

Prithviraj deshmukh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विश्वजीत कदम – विशाल पाटील या जोडगोळीने लोकसभा निवडणुकीत विषय खोल केला… आणि आमदारकी आपल्या खिशात टाकत सांगलीचे आपणच वाघ हे दाखवून दिलं…पण आजचा विषय आपला लोकसभेचा नाहीये… आपण बोलणार आहोत सांगलीत खासदारकीला किंगमेकर ठरलेल्या आमदार विश्वजीत कदमांच्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाबाबत… कारखानदारी, संस्थात्मक जाळं उभारून वडिलांचा राजकीय वारसा नेटाने पुढे चालवणाऱ्या विश्वजीत कदमांना यंदा परंपरेप्रमाणे फाईट देणार आहे ते देशमुख घराणं… देशमुख विरुद्ध कदम हा या मातीतला तसा जुना संघर्ष… आता अगदी दुसऱ्या पिढीपर्यंत झिरपत येऊन पोहोचलाय… याच देशमुखांनी ना सलग दोनदा धूळ चारली होती… त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी आता देशमुख घरातला एक चेहरा विश्वजीत कदमांना चितपट करण्यासाठी फिल्डिंग लावून बसलाय… विधानसभेच्या आखाड्यात बघायला मिळणारी पलूस कडेगाव मधील देशमुख विरुद्ध कदम ही बिग फाईट नेमकी आहे तरी काय? विश्वजीत कदमांना पाणी पाजण्याची धमक देशमुख यांच्यात खरंच आहे का? येणाऱ्या विधानसभेला पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होतोय? त्याचाच हा इंडेप्थ आढावा…

पूर्वीचा वांगी-भिलवडी मतदार संघ पुनर्रचनेनंतर पलूस-कडेगाव या नावाने ओळखला जाऊ लागला… माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांचा हा बालेकिल्ला…. स्व.वसंतदादा पाटील यांच्या हयातीमध्येच या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व संपतराव चव्हाण यांनी केल होतं…. मात्र १९८५ मध्ये पतंगराव कदमांनी अपक्ष मैदानात उतरून आमदारकी आपल्या बाजूला खेचून आणली.. त्यानंतर डायरेक्ट काँग्रेसमध्ये ॲक्टिव्ह होत मतदार lसंघातील लोकांना भारती विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगाराची संधी देत असतानाच मतदारसंघात कारखानदारीला प्रोत्साहन दिलं… संस्थात्मक जाळ घट्ट बांधत मतदारसंघात आपली हक्काची एक वोट बँक तयार केली… यानंतर पतंगराव कदम हेच वांगी भिलवडी मतदारसंघातून वन साईड निवडणूक खेचून आणत असताना त्यांना खरा धक्का बसला तो 1995 साली… संपतराव देशमुख यांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या बिग बी पतंगराव कदमांना पराभवाची धूळ चारत आमदारकी खेचून आणली… तेव्हापासून कदम आणि देशमुख या घराण्यात राजकीय विस्तवाला सुरुवात झाली… ज्याची झळ पुढच्या पिढीलाही बसतेय…

पण संपतराव देशमुख यांच्या आकस्मिक निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत देशमुख गटाकडून मैदानात उतरलेल्या बंधू पृथ्वीराज देशमुख यांनी कदम गटावर पुन्हा मात करीत आमदारकी पटकावली…. थोडक्यात तालुक्याच्या राजकारण्यातून पतंगराव कदम काही काळ बॅकफुटला फेकले गेले… हा सिलसिला असाच कायम राहिला असता तर आज देशमुख हे सांगलीतील मोठं प्रस्थ झालं असतं… पण पतंगराव कदमांनी राजकीय छक्केपंजे वापरत मतदार संघावर पुन्हा ठाण मांडली ती कायमचीच…यानंतर या मतदार संघावर कब्जा मिळविण्याचे देशमुख गटाचे प्रयत्न यशस्वी झाले नसले तरी थांबलेलेही नाहीत. यामुळे कदम गटाला या मतदार संघात एकहाती यश मिळेलच याची आजही खात्री देता येत नाही….

मतदारसंघात देशमुख गटाला पुन्हा एकदा स्पेस मिळाला तो पतंगराव कदम यांच्या निधनानंतर… सहानुभूतीची लाट आणि पक्षाचा प्रभाव पाहता पोटनिवडणूक बिनविरोध झाली… आणि पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाची सूत्र विश्वजीत कदमांच्या हातात आली… 2019 ला भाजपची लाट असताना देशमुख विश्वजीत कदमांच्या राजकारणाला हादरा देतील… बालेकिल्लाला भगदाड पाडतील… अशा चर्चा सुरू असतानाच युतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटली… संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी मागे घेत विश्वजीत कदमांसाठी घोडे मैदान सोपं करून दिलं… शिवसेनेने या ठिकाणी जिल्हा प्रमुख संजय विभुते यांना उमेदवारी दिली. मात्र, ही निवडणुक चुरशीची तर झाली नाहीच, पण देशमुख गटाकडून नोटाला झालेले मतदान पाहून विश्वजीत कदमांच्याही काळजाचा ठोका चुकला असावा, हे वेगळ्या शब्द सांगायला नकोच…पण आता नाही तर कधीच नाही… असं म्हणत सध्या देशमुख गट आक्रमक झालाय… काही केल्या विश्वजीत कदमांना विधानसभेला पाणी पाजायचंच… अशी जणू शपथ घेऊन संग्रामसिंह देशमुख तयारीला लागलेत..

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या कारकि‍र्दीत त्यांनी मतदारांशी थेट संपर्क राखला असून त्यांचे चुलत बंधू आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची साथ त्यांना राहील अशी चिन्हे सध्या तरी दिसत आहेत… लोकसभेवेळीही पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारीवर हक्क सांगितला होता. मात्र, त्यांना डावलून पुन्हा संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यानं देशमुखांनी विरोधाची भूमिका घेतली… मात्र, यात संग्राम देशमुख यांनी पक्षाचा आदेश मानत भाजपसाठी काम केल… तरीही या मतदारसंघात विशाल पाटलांना ३६ हजार १८२ चं लीड मिळालं… थोडक्यात देशमुखांच्या ताकदीपेक्षा कदमांचीच हवा सध्या तरी पलूस कडेगाव मध्ये दिसतेय….

क्रांती कारखान्याच्या माध्यमातनू अरुण लाड गट सक्रिय आहे. या गटाचा आता कडेगाव नगरपंचायतीपर्यंत विस्तार झाला असून या गटाची मर्यादित ताकद असली तरी काटाजोड लढतीमध्ये या गटाची भूमिका मतदार संघाचा निकाल बदलण्याइतपत निश्‍चितच राहणार आहे. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये देशमुख आणि लाड यांच्यातच लढत झाली होती.. लाड यांनी या निवडणुकीत विजय मिळवला. ही उर्जा आता या गटाची ताकद बनली असून नव्या पिढीचे तरूण नेतृत्व म्हणून क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड मैदानात उतरण्यासाठी चाचपणी करत आहेत. गटाची ताकद वाढविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यातून त्यांची ताकद कोणाच्या पारड्यात पडते की, ताकद अजमावण्यासाठी फक्त ते मैदानात उतरतायत? हे देखील इथं महत्वाचं ठरेल… पण शरद पवारांनी लक्ष घातलं तर हे एकगठ्ठा मतं कदमांच्या पाठीशी जाऊ शकतं, ही वस्तुस्थिती देखील नाकारून चालणार नाही….

महाविकास आघाडीची ताकद प्लस संस्थात्मक जाळ्यांनी तयार झालेलं हक्काचे मतदान प्लस लाड गट प्लस खासदार विशाल पाटलांची ताकद या सगळ्यांची गोळा बेरीज करून पाहिली तर विश्वजीत कदम हे सध्याच्या स्थितीला तरी अनबिटेबल वाटतायत… 2019 ला शिवसेनेला तिकीट मिळाल्याने विश्वजीत कदमांकडूनच ही सीट मॅनेज झाल्याची चर्चा खमंगपणे आजही राजकीय वर्तुळात होत असते… तेव्हा देशमुखांनी माघार घेतली… पण आता काहीही झालं तरी आपलं राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी संग्राम देशमुख यंदाच्या निवडणुकीत जीव तोडून लढणार, हे वेगळ्या भाषेत सांगायला नको… त्यात कदमांच्या संस्थात्मक वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी देशमुखांनीही साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संघ उभारून शेरास सव्वाशेर होण्याचा प्रयत्न केलाय…त्यामुळे विश्वजीत कदम विरुद्ध संग्राम देशमुख या राज्यातील सर्वात हाय व्होल्टेज असणाऱ्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा यंदाचा आमदार कोण होतोय? पक्षाची राज्याच्या राजकारणाची सूत्र हातात घेऊ पाहणाऱ्या विश्वजीत कदमांना स्वतःच्याच मतदारसंघात देशमुख दणका देतील का? तुम्हाला काय वाटतं? पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा 2024 चा आमदार कोण? तुमच मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा…