स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी, तांबवे ग्रामपंचायत 82 वर्षाची… विशेष मागोवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी |विशाल वामनराव पाटील
कराड तालुक्यातील तांबवे ग्रामपंचायतीची स्थापना 19 डिसेंबर 1940 रोजी झाली. या गावाने अनेक ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक व धार्मिक घडामोडी पाहिल्या आहेत. दिवसेंन दिवस बदल या गावाने अनुभवले आहेत. कोयना नदीकाठ ते साजूर, पाठरवाडी अन् डेळेवाडीचा डोंगर भाग एकत्रित असलेले पूर्वीचे तांबवे हे एकच गाव होते. आज लोकसंख्या वाढली अन् त्यांची विभागणी झाली. आज स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी असलेली तांबवे ग्रामपंचायत 82 व्या वर्षाची झाली, त्यानिमित्ताने थोडक्यात तांबवे गावाचा व परिसराचा मागोवा…

स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी असलेले तांबवे हे गाव तालुका, जिल्हा, राज्यात माहिती आहे. या गावातील तरूण आज देशात नव्हे तर परदेशातही आपल्या गावाचे नाव अभिमानाने सांगत आहे. या गावाला वारसा स्वातंत्र्यपूर्व काळाचा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य सैनिकाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन तांबवे येथील कोयना नदीकाठी वाळवंटात झाले होते. येथे आजही त्यावेळेचे गांधी छ्प्पर आहे. गांधी छप्परला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, त्यांची जपणूक होत नाही, ही शोकांतिका आहे कारण त्यांचा इतिहास आजच्या तरूण पिढीला माहिती नाही. अधिवेशनाला कोयनेच्या पाण्यातून बोटीतून (त्यावेळची नाव) आलेले होते.

Tambave Gram Panchayat

तांबवे गावात आताची साजूर, गमेवाडी, आरेवाडी, तांबवे, उत्तर तांबवे, डेळेवाडी या ग्रामपंचायीचा समावेश होता. पहिली ग्रामपंचयात (त्यावेळची चावडी) मधल्या पाराजवळ (आताचे गांधी चाैक) सन 1940 पासून कार्यरत होती. तेव्हा पहिले सरपंच हे आण्णा बाळा पाटील (भाऊ) हे होते. 1967 सालच्या भूकंपानंतर मुख्य बाजारपेठेत मातीचे ग्रामसचिवालय संकल्पना राबविण्यात आली. त्यावेळी पोस्ट आॅफिस, तलाठी व ग्रामपंचायत माती मुख्य बाजारपेठेत आणण्यात आले. तर 1988 ते 89 मध्ये बाजारपेठेत पंचायत भवन ही सिमेंट काॅक्रटीकरणाची इमारत बांधण्यात आलेली आहे. याठिकाणी आज बॅक आॅफ महाराष्ट्र, सीटी सर्व्हे आॅफिस, तलाठी आॅफिस कार्यरत आहे.

तांबवे येथे कोणताही शासकीय निधी न घेता तांबवे ग्रामपंचायतीने 1997-98 साली स्वमालकीचे व्यापारी संकुल उभारले आहे. ज्यामधून ग्रामपंचायतीला भाडे मिळत आहे, परंतु नाममात्र भाड्यावर अनेकांनी उद्योग उभे केले आहेत. तांबवे ग्रामपंचायतमधून 2005 साली उत्तर तांबवे ग्रामपंचायत वेगळी झाल्याने तेव्हा असलेले 17 ग्रामपंचायत सदस्य आता 13 आहेत. कराड तालुक्यातील काले ग्रामपंचायत नंतर तांबवे ग्रामपंचातीचा उल्लेख केला जातो. तांबवे ग्रामपंचायतीला सन 2015-16 साली नविन 50 लाखांची इमारत मिळाली आहे. तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण पहिली पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली आहे.

Tambave Gram Panchayat

तांबवे ग्रामपंचायतीत 1940 ते आजपर्यंतचे सरपंच खालीलप्रमाणे
आण्णा बाळा पाटील, कृष्णा दौलता पाटील, शंकराव गोविंदराव पाटील, जयसिंग गोविंदराव पाटील (दोन वेळा सरपंच), केशव लखू पाटील, नारायणराव दत्तात्रय ताटे (तीन वेळा सरपंच), शंकरराव कृष्णाजी पाटील, दत्तात्रय धोंडजी पाटील (आबा), पांडुरंग ज्ञानदेव पाटील (दाजी), दाजी हंबीरराव साठे, शकुंतला धनाजी खडग (पहिली महिला सरपंच), प्रदीप जालिंदर पाटील, विठोबा वसंत पाटील, संतोष रामचंद्र कुंभार, जावेद रुस्तुम मुल्ला, शोभाताई बाळासाहेब शिंदे (विद्यमान महिला सरपंच) आहेत. ग्रामपंचायतीत सर्वांत जास्त काळ लोकप्रतिनिधी म्हणून पी. डी. पाटील (दाजी), द. धो. पाटील (आबा) यांनी काम पाहिले.

तांबवे भागाच्या विकासात कोयना नदीवरील पूलाचे योगदान
तांबवे गावच्या व भागाच्या विकास महत्वपूर्ण योगदानाकरिता दळणवळण सुरू होणे गरजेचे होते. त्यामुळे 1980 च्या दशकात महाबळेश्वर येथील राजभवानात गावातील प्रमुख लोकांनी कोयना नदीवर पुलाची मागणी केली होती. तत्कालीन लोकप्रतिनिधी व मंत्री यशवंतराव मोहिते, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी या पुलासाठी पाठपुरावा केला. त्यावेळेचे मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या हस्ते 15 लाख रूपये खर्चून उभारण्यात आलेल्या तांबवे पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या पुलाचे काम कराडच्या प्रितीसंगम कन्ट्रक्शनने केले. तांबवे भागाच्या दळणवळात योगदान देणारा हा पूल 2019 सालच्या पूराच्या पाण्यात पडला. त्यानंतर तो पूल नामशेष करण्यासाठी 25 लाख खर्च आला.

राजकीय घडामोडी
तांबवे भागाने अनेक घडामोडी पाहिल्या अन् साक्षीदारही राहिला. यामध्ये प्रामुख्याने 1991 साली धर्मांद जातीयवाद विरोधी राज्यस्तरीय परिषद शरद पवार यांच्या उपस्थितीत तांबवे गावात झाली. या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील- उंडाळकर, विक्रमसिंह पाटणकर आणि शंभूराज देसाई यांनी नेतृत्व केले आहे.