मराठा आरक्षण न्यायालयात का टिकू शकलं नाही? पंकजा मुंडे म्हणाल्या, आरक्षणाचा मसुदा..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जालना येथील लाठीहल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. मराठा आरक्षणाचा मसुदा व्यवस्थित नव्हता. त्यामुळे मराठा आरक्षण न्यायालयात टिकू शकले नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. पंकजा मुंडे यांनी राज्यभर शिवशक्ती परिक्रमा सुरू केली आहे. त्यानिमित्ताने शिखर शिंगणापुरात येऊन त्यांनी शंभू महादेवाला अभिषेक करून पूजा केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले.

शिवशक्ती परिक्रमा करत पंकजा मुंडे या शिखर शिंगणापुरात आल्या होत्या. त्यांच्या सोबत आमदार माधुरी मिसाळ होत्या. खासदार उदयनराजे भोसले यांच्या समवेत त्यांनी शंभू महादेवाला अभिषेक केला. मंदिर समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मराठा आरक्षणाचा मसुदा व्यवस्थित मांडण्याचे काम संबंधित कमिटीने योग्य पध्दतीने केले नाही. कमिटीचा मसुदा निट असता तर मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळालं असतं. मसुदा ( ड्राफ्ट) निट नसल्यानेच न्यायालयात आरक्षण टिकलं नाही.

उदयनराजेंकडून तलवार देऊन स्वागत

आज शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाचे दर्शन घेऊन पूजा केली. माझे मोठे बंधू खासदार उदयनराजे भोसले यांनी माझा सन्मान केला आहे आणि लढण्यासाठी तलवार भेट दिली आहे. समाजाप्रती त्यांची खूप तळमळ असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. माझा शिवशक्ती परिक्रमा दौरा सुरु आहे. आतापर्यंत दोन शक्ती पिठांचे आणि दोन जोतिर्लिंगाचे दर्शन झालंय. माझी लोकांना भेटण्याची आणि देवदर्शनाची इच्छा होती. सातारा जिल्ह्यात माझे उत्साहात माझे स्वागत झाले, असेही त्यांनी सांगितले.

शंभू महादेवाने शक्ती द्यावी

दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांची अपुरी इच्छा आणि लोकसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शंभू महादेवाने मला शक्ती द्यावी, असे शंभू महादेवाला साकडे घातल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्ताने शिखर शिंगणापूर येथे त्यांचे ग्रामपंचायत आणि पळशी ग्रामस्थांच्या वतीने फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. खासदार उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे यांना तलवार भेट देऊन स्वागत केले. त्यानंतर गाभार्‍यात जाऊन त्यांनी शंभू महादेवाला रुद्राभिषेक केला. यावेळी सातारच्या माजी नगराध्यक्षा रंजना रावत, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माण तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, माजी सभापती अतुल जाधव, सिद्धार्थ गुंडगे आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.