पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये मराठमोळ्या सचिनने रचला इतिहास; गोळा फेकमध्ये भारताला 40 वर्षांनंतर पदक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये मराठमोळ्या सचिन खिलारीने गोळाफेक मध्ये शॉटपुट F46 प्रकारात रौप्यपदक जिंकले आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे 21 वे पदक असून तब्बल 40 वर्षांनंतर भारताला गोळा फेकमध्ये पदक मिळालेलं आहे. यापूर्वी 1984 मध्ये भारताने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये पहिले पदक जिंकले होते. सचिनने 16.32 मीटरच्या उत्कृष्ट थ्रोसह रौप्यपदक पटकावले. सचिनचे सुवर्णपदक अवघ्या 0.06 मीटरने हुकले. सचिनने दुसऱ्या प्रयत्नातच 16.32 मीटर फेक केली होती. मात्र, त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने 16.38 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकले.

शॉटपुट फायनलमध्ये सचिनचा पहिला प्रयत्न 14.72 मीटर, दुसरा प्रयत्न 16.32 मीटर, तिसरा प्रयत्न 16.15 मीटर, चौथा प्रयत्न 16.31 मीटर, पाचवा प्रयत्न 16.03 मीटर आणि सहावा (शेवटचा) प्रयत्न 15.95 मीटर होता. त्याने 16.32 मीटर फेक करून क्षेत्रविक्रमही केला. या स्पर्धेत एकूण तीन भारतीय सहभागी झाले होते. त्यातील मोहम्मद यासर आणि रोहित कुमार यांना व्यासपीठ पूर्ण करता आले नाही. त्यांनी अनुक्रमे 14.21 मीटर आणि 14.10 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह 8 वे आणि 9 वे स्थान पटकावले.

पॅरालिम्पिकच्या इतिहासात शॉटपुटमध्ये पदक जिंकणारा सचिन खिलारी हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी 1984 मध्ये जोगिंदर सिंग बेदीने कांस्यपदक जिंकले होते आणि महिला धावपटू दीपा मलिकने 2016 च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. सचिनने 2023 वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F46 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याने वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. F46 श्रेणी अशा खेळाडूंसाठी आहे ज्यांच्या हातात कमकुवतपणा आहे, स्नायू कमकुवत आहेत किंवा त्यांच्या हातात हालचाल कमी आहे.

दरम्यान, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारत आता पदतालिकेत 21 पदकांसह 19व्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत 3 सुवर्णपदक, 8 रौप्यपदक आणि 10 कांस्यपदक जिंकली आहेत. मागील पॅरालिम्पिक स्पर्धेत 19 पदके जिंकली होती, त्यामुळे यंदा भारताने गतवेळी पेक्षा चांगली कामगिरी केली आहे असं म्हणता येईल.