खासदार ठाकरेंचा, पण आमदार कुणाचे असतील, पहा परभणी जिल्ह्यातील विधानसभांचे सविस्तर विश्लेषण

Parbhani
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात जर्मनी, भारतात परभणी…असं आम्ही नाही तर लोकं म्हणतात… बाकी परभणीचा भकासलेपणा आणि विकासापासून कोसो दूर असणाऱ्या गावांना स्वातंत्र्यापासून विकासाचा व देखील शिवला नाहीये.. निजामकालीन असणाऱ्या या जिल्ह्याच्या पाठीमागून जालना, नांदेडसारखी जिल्हे तयार झाले.. त्यांच्यात विकासाची गंगा वाहू लागली… पण परभणी जैसै थै वैसेच आपल्या जुनाटपणाचा वारसा जपत आला… अर्थात ही चूक परभणीकरांची नक्कीच नव्हती, तर ती होती इच्छाशक्ती हीन परभणीच्या राजकारण्यांची…अवघे चारच विधानसभा मतदारसंघ असणारा हा जिल्हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला.. मातोश्री ज्याच्याकडे बोट दाखवेल तो खासदार.. आणि आमदार असा इथला राजकीय इतिहास… शिंदेंच्या फुटीतही जिल्ह्यातले लोकप्रतिनीधी हे ठाकरेंशी एकनिष्ठ राहीले.. त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संजय ऊर्फ बंडू जाधव या ठाकरेच्या शिलेदारानेच पुन्हा खासदारकीचं मैदान मारलंय.. थोडक्यात जिल्ह्यातील वारं सध्यातरी महाविकास आघाडीच्या बाजूने सध्यातरी पहायला मिळतंय.. त्यामुळे जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात सध्या राजकारण कसं शिजतंय? या चार जागांवर कुठले चार आमदार निवडून येतील? त्यांचे प्लस – मायनस नेमके काय आहेत? त्याचाच घेतलेला हा राजकीय आढावा…

यातला पहिला मतदारसंघ येतो तो परभणी विधानसभेचा… शिवसेनेचे राहुल पाटील हे सध्या परभणी विधानसभेचे विद्यमान आमदार. २०१४ पासून सलग दोन टर्म त्यांनी परभणीच्या बालेकिल्ल्यावर शिवसेनेचा भगवा फडकवलाय… परभणीच्या पाठीमागच्या बहुतांश निवडणुकांमध्ये खान हवा की बाण हवा… या टॅगलाईन खाली प्रचार रंगत असतो. निकालातही याच रिफ्लेक्शन नेहमी पाहायला मिळालं. यामागचं महत्वाचं कारण म्हणजे मतदारसंघातील असणारी मुस्लिम समाजाची संख्या… १९९० च्या निवडणुकीत हनुमंत बोबडे यांनी शिवसेनेकडून काँग्रेसच्या आयेशा इकबाल यांचा पराभव करून शिवसेनेचं जणू या मतदार संघावर नावच कोरलं…. 1990 ते 2014 पर्यंतच्या सर्व निवडणुकीत इथं शिवसेनेचाच विजय झाला… शिवसेनेच्या मराठा उमेदवारांच्या विरोधात काँग्रेस मुस्लिम बहुल मतदार डोळ्यासमोर ठेऊन उमेदवार देत आली.. पण प्रत्येकवेळेस शिवसेनेचा भगवा त्यावर भारी पडत आला.. म्हणूनच खान हवा की बाण…अशी म्हणच या मतदारसंघात रुढ झाली…

२०१९ मध्ये काँग्रेसच्या रविराज देशमुख यांनी मतदारसंघातून लढत दिली खरी पण राहुल पाटील यांनी सर्वांचच डिपॉझिट जप्त करत आमदारकीची माळ आपल्या पदरात पाडून घेतली… प्रोब्लेम फक्त असा होता की खासदार बंडू जाधव आणि आमदार साहेब राहुल पाटील यांच्यात विस्तव होता.. त्यांना २०१९ ला हक्काच्या परभणीच्या मतदारसंघातच मोठी पिछाडी झाली होती.. अगदी मातोश्रीच्या दारावर त्यांची भांडण पोहचली होती.. पण पुढे दोघांच्यातील हे अंतर कमी होत गेलं. शिवसेनेच्या फुटीच्या काळात तर दोघेही उद्धव ठाकरेंसोबत राहील्याने आपसूकच त्यांच्यातील संबंध पुन्हा रुळावर आल्याचं बोललं गेलं. लोकसभेला बंडू जाधवांना परभणीतून मिळालेलं लीड पाहता विधानसभेलाही राहुल पाटील आमदारकीची हॅट्रीक मारतायत, अशी चिन्हं सध्यातरी पाहायला मिळतायत… पण यंदा धनुष्यबाणावर नाही तर मशालीच्या चिन्हावर परभणीत शिवसैनिकांना प्रचार करण्याची पहिल्यांदाच वेळ येणार आहे..

दुसरा मतदारसंघ आहे तो गंगाखेडचा… काळी कसदार जमीन अन् गोदावरी नदीचा समृद्ध वारसा लाभेलला मतदार संघ म्हणजे गंगाखेड… राखीव असलेला हा मतदार संघ 1995 पर्यंत तसा शेकापचा गढ… यातल्या ज्ञानोबा गायकवाड यांनी तर गंगाखेडवर सलग चार टर्म शेकापचा लाल झेंडा फडकविण्याचा त्यांनी रेकॉर्ड केला… मात्र १९९५ मध्ये इथल्या राजकारणानं नवं वळण घेतलं… अभ्युदय बँकेचे चेअरमन सीताराम घनदाट अपक्ष म्हणून गंगाखेडवर निवडून आले.. त्यांनी मतदारसंघावर तब्बल २००४ पर्यंत आपल्या आमदारकीच्या माध्यमातून वर्चस्व ठेवलं… पण यानंतर गंगाखेडचा मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्यावर इथं बऱ्याच राजकीय उलथापालथी पाहायला मिळाल्या… सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी तालुक्याच्या राजकारणात एन्ट्री केल्याने इथं भल्याभल्यांच्याा राजकीय करिअरला ब्रेक लागला. २०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक गटतट, पक्षांची आणि नव्या चेहऱ्यांची मतदारसंघात एन्ट्री झाली…रत्नाकर गुट्टे – रासप, मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी तर ज्यांनी गंगाखेडच्या राजकारणात स्वत:चा जम बसवला होता अशा सीताराम घनदाटांनी अपक्ष निवडणूक लढवली… मग काय एक मोठा उद्योजक, एक देशातील सर्वात मोठ्या मल्टीस्टेट बँकेचा चेअरमन तर तिसरा नेता आणि कंत्राटदार असं एकमेकांना कट टू कट झालेल्या या लढतीत गंगाखेडने मात्र अवघ्या २२८९ मतांच्या लीडने राष्ट्रवादीच्या केंद्रेंच्या बाजूने कौल दिला.. पण या सगळ्या राजकारणाच्या नादात मतदारसंघाकडे पुरतं दुर्लक्ष झालं…त्यात तत्कालीन आमदार केंद्रे आणि रत्नाकर गुट्टे यांच्यात मधल्या काळात बराच संघर्ष पाहायला मिळाला.. एका आर्थिक व्यवहारात रत्नाकर गुट्टे यांना काही काळ तुरुंगात राहावं लागलं… त्यामुळे तुरुंगात राहूनच त्यांनी २०१९ ची गंगाखेडची विधानसभा निवडणुक लढवली… आणि आश्चर्य म्हणजे मधुसूदन केंद्रे यांचा पराभव होऊन गंगाखेडच्या जनतेनं रत्नाकर गुट्टे यांच्या बाजूने कौल दिला… आणि गुट्टेंनी गंगाखेडच्या मातीत विजयाचा भंडारा उधळला.. मात्र सिबीआय, इडीच्या चौकशींमुळे गुट्टे यांच्या राजकीय इमेजला सेट बॅक बसलाय… तर भाजपनेही या मतदारसंघावर दावा करत रासप वर्सेस भाजप या नव्या संघर्षाला तोंड फोडलंय… त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नाकर गुट्टे यांना आपल्या मतदारसंघातूनच जानकरांच्या पाठीशी लीड देऊ शकले नाहीत.. त्यामुळे गंगाखेडमध्ये सध्यातरी बदलाचे वारे वाहू लागलेत.. पण गुट्टे यांचा स्थानिक राजकारणावरचा होल्ड पाहता गुट्टे यांना डावलणंही भाजपला परवडणारं नाही, विशाल कदम नावाची असणारी चर्चा इथं इंटरेस्टींग लढत घडवून आणणार एवढं मात्र नक्की…

तिसरा मतदारसंघ आहे जिंतूरचा… एकिकडे लोअर दुधना तर दुसरीकडे येळदरी धरण.. आकाराने प्रचंड मोठा विस्तार असलेल्या जिंतूरला राष्ट्रीय महामार्गांनी जोडलेला मतदारसंघ म्हणून ओळख आहे… हायवे जोडले गेले मात्र जिंतूरला विकासाशी इथल्या नेत्यांना कधीच जोडता आलं नाही… रामप्रसाद बोर्डीकर अनेक टर्म जिंतूरचे आमदारच नाही, तर त्यांनी या मतदारसंघावर वर्चस्व केलं असं म्हणायला काहीच हरकत नाही… १९९० ते २०१४ या संपूर्ण काळात म्हणजे विधानसभेच्या सहाही टर्म बोर्डीकरांनी काँग्रेसच्या तिकीटावर जिंकल्या… बोर्डीकरांनी इथे साधा आपला विरोधकही निर्माण होऊ दिला नाही… पण बोर्डीकर विरुद्ध अजितदादा यांच्यात विस्तव पडल्यानं इथं विजय भांबळे यांना अजितदादांनी ताकद दिली.. आणि २०१४ मध्ये बोर्डीकरांच्या वर्चस्वाला नख लावत भांबळे यांनी राष्ट्रवादीला मतदारसंघात बेस मिळवून दिला… पण बदललेली राजकारण पाहता पुढे बोर्डीकर भाजपात गेले.. त्यांच्या मुलीला लोकसभेचं तिकीट देण्याचीही खलबतं झाली.. पण शेवटी भाजपनं त्याची भरपाई मेघना बोर्डेकर यांना २०१९ च जिंतूरचं तिकीट देऊन केली… विजय भांबळे विरुद्ध मेघना बोर्डीकर अशा झालेल्या या अटीतटीच्या लढतीत बोर्डीकर यांनी आपली पुरी यंत्रणा कामाला लावत मेघना बोर्डीकर यांना निवडून आणलंच…पण हा विजय अवघ्या चार हजार मतांच्या निसटत्या लीडचा होता… सध्याचं करंट स्टेटस पाहायचं झालं तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या म्हणजेच संजय जाधव यांच्या पाठीशी जिंतूरनं लीड दिल्याने येणाऱ्या विधानसभेला मेघना बोर्डेकर यांची आमदारकी धोक्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही माजी आमदार विजय भांबळे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. मुळात विजय भांबळे हे अजित पवार गटाचे होते पण तरी देखील त्यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघात फूट पडली असतानाही एकतर्फी किल्ला लढवत भांबळे यांनी जाधवांच्या पाठीशी निर्णायक लीड दिलं… त्यामुळेच जिंतुरमध्ये यंदा भांबळे शरद पवारांची तुतारी आरामात वाजवतील, असा एकूणच मतदारसंघाचा कल दिसतोय…

आता येतो तो शेवटचा मतदारसंघ अर्थात पाथरीचा… सिंचन व्यवस्थेनं परिपूर्ण असणाऱ्या पाथरीचा विकास मात्र कायम खुंटलेला… सगळे पक्ष बदलून झाले, अपक्षालाही संधी दिली आणि आता काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने कौल दिलेल्या पाथरीत मात्र काहीच बदललं नाहीये… विकासकामांना खीळ लागलेल्या साईंचं जन्मस्थान असणाऱ्या पाथरीचे विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे सुरेश वर्पुरडकर… खरंतर काँग्रेसने जिंकलेल्या या पाथरीच्या राजकारणाची सुरुवातच मुळात शिवसेनेपासून झाली होती… १९९० पासून मतदारसंघात सलग ३ वेळा शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या रूपाने हॅट्रिक केली होती. २००४ मध्ये राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे विद्यमान आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शिवसेनेचे विजयी घोडदौड रोखली होती… पुनर्रचनेनंतर मात्र कोणत्याही एका पक्षाला सातत्याने विजय घेता आला नाही. २००९ साली मीरा रेंगे यांच्या रूपाने शिवसेनेला विजय मिळवता आला परंतु 2014च्या निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार मोहन फड यांनी सर्वच पक्षांना धूळ चारत विजय मिळवला… तर काँग्रेसचे सुरेश वरपुरडकर या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते… पुढे अपक्ष लढत दिलेल्या मोहन फड साहेबांनी भाजप व्हाया शिवसेना वारी केली..शिवसेनेत खासदार संजय जाधव यांच्याशी वितुष्ट आल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला… पण युतीत संघर्ष झाल्यानं भाजपच्या चिन्हावर निवडणुक लढूनही फड यांचा पराभव करुन काँग्रेसच्या वरपूडकरांनी पक्षावर काँग्रेसचा झेंडा फडकवला… मागच्या पाच वर्षात इथलं राजकारण बरंच फिरलं आहे.. त्यामुळे वरपुडकर यांच्या बाजूनेच इथला निकाल असला तरी राजेश विटेकर इथं गेमचेंजर भुमिकेत दिसू शकतात… तर असा आहे परभणीतील या चार विधानसभा मतदारसंघांचा संभाव्य निकाल… बाकी परभणीत यंदा आमदारकीच्या गुलालाचे मानकरी कोण असतील, ते आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा,