परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
परभणी येथील जिल्हा रुग्णालयात ७४ संशयीत रुग्णांची नोंद झाली असून एकुण घेण्यात आलेले स्वॅब ५७ व त्या पैकी ३१ निगेटिव्ह असुन १७ स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. (९ स्वॅब रिजेक्टेड आहेत ) त्या पैकी ४५ परदेशातून आलेले व त्यांच्या सहवासातील व देशातंर्गत ४ असे एकुण ४९ नागरिक निगरानीखाली आहेत. जिल्ह्यात आज रोजी कोरोना विषाणु बाधीत एक ही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगु नये तसेच अफवावर विश्वास ठेवु नये. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयात नोंद असलेल्या ७४ नागरिकांपैकी १५ नागरिक रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्ये तर उर्वरित ५९ नागरिक त्यांच्या घरी विलगीकरण ( होम क्वारंटाईन ) करण्यात आले आहेत. त्यांच्या निवासस्थानी वैद्यकिय पथकामार्फत फेरतपासणी करण्यात आली आहे . या ५९ रुग्णाची प्रकृती स्थिर असून आज नवीन ७ रुग्णांची जिल्हा रुग्णालयात नोंद झाली आहे तर कोरोना बाह्य रुग्ण विभागात १०५ संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. काल दि.23 मार्च 2020 रोजी एकुण ११ रुग्णांचे नमुना (स्वॅब) तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणु संस्थेस पाठविण्यात आले आहेत .
जिल्हयात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन जिल्ह्यामध्ये कोरंन्टाईनसाठी ३२० खाटा व आयसोलेशनसाठी शासकीय व खाजगी असे एकुण २२५ खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत . जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधक मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी परभणीचे जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे , उपजिल्हाधिकारी डॉ . संजय कुडेटकर , उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यंवशी, उप प्रादेशीक परिवहन अधिकारी काटकर , प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योत्स्ना धुळे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . बी. एस. नागरगोजे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . शंकरराव देशमुख , महापालिका आयुक्त रमेश पवार , पोलिस उपअधिक्षक मुळे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी यादव, अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सरकटे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांना नोडल अधिकारी म्हणुन आदेशीत केले आहे. दरम्यान जिल्ह्यात मागील १५ दिवसात परदेशातुन आलेल्या नागरिकाविषयी माहिती देण्यासाठी जिल्हा आपत्ती प्रशासनास दु. ०२४५२ -२२२५६० क्रमांकावर संपर्क साधावा असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.