Parbhani Lok Sabha 2024 : ठाकरेंच्या निष्ठावान खासदाराला परभणीची जनता पुन्हा विजयी करणार??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परभणी लोकसभा मतदारसंघ… (Parbhani Lok Sabha 2024) एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतरही शिवसेनेच्या शिंदे यांच्या बंडाची फारशी झळ न बसलेला हा जिल्हा…सगळे सोडून गेले पण शिवसेनेचे परभणीतील आमदार, खासदार एकनिष्ठ राहिले. तसं पाहायला गेलं तर हा शिवसेनेचा पारंपारिक आणि कडवा मतदारसंघ. 1989 पासून 1998 चा एक अपवाद वगळता या जिल्ह्याने शिवसेनेलाच कौल दिला. 1957 च्या निवडणुकीत एन. के. पनगरकर यांच्या रूपाने जिल्ह्याला पहिला खासदार मिळाला. यानंतर काँग्रेसच्या शिवाजीराव देशमुख तर शेकापच्या शेषराव देशमुख यांनी या जागेवर बाजी मारली. मात्र 1989 मध्ये राम मंदिर आणि शहाबानो खटला देशभर गाजत असल्यानं समाज मानस ढवळून निघालं. राजकारणात निष्क्रिय असणाऱ्या जनतेला बाळासाहेबांच्या नव हिंदुत्वाचे धूमारे बसले..

आणि शिवसेना पक्ष मुंबईसारख्या अवाढव्य शहरापासून मराठवाड्यातल्या गाव खेड्यात मूळ धरू लागली. यात सगळ्या प्रक्रियेला यश आलं. आणि 1989 मध्ये परभणीत सुरेश जाधव यांच्या रूपाने एका शिवसैनिकाला खासदार होण्याचा मान मिळाला. यानंतर मतदारसंघात शिवसेनेने कधी मागे वळून पाहिलंच नाही. यानंतर सुरेश जाधव, तुकाराम रिंगेपाटील, गणेशराव दुधगावकर असे खासदार बदलत गेले मात्र पक्ष सेम राहिला तो म्हणजे शिवसेना…विशेष म्हणजे 2014 मध्ये विरोधकांच्या बालेकिल्ल्याला हादरे बसलेले असताना परभणीत मात्र शिवसेनेचा भगवा काही उतरला नाही..

2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांचं मोठं आव्हान होतं. मात्र विजय हा शिवसेनेचा झाला. संजय जाधव हे 1 लाख 27 हजार 155 मतांनी विजयी झाले होते. 2019 लाही त्यांनी राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा मोठ्या फरकानं पराभव करत दुसऱ्यांदा परभणीतून खासदारकीचा मिळवला. 2019 ची ही निवडणूक अत्यंत चुरशीची राहिली…कारण परभणीकरांना यंदा पहिल्यांदाच तिरंगी लढत पाहायला मिळाली…शिवसेनेकडून संजय जाधव यांच्या पाठीशी शिवसैनिक होतेच, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांना निवडून आणण्यासाठी स्वतः अजित पवार मैदानात उतरले होते…तर तिसरीकडे महाराष्ट्रातील ज्या काही ठराविक मतदारसंघात वंचित फॅक्टर चालला त्यात परभणीचाही समावेश होता…वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांनी तब्बल लाखभर मतं खाल्ली. पण बाण की खान? अशा प्रचाराने चाललेल्या या निवडणुकीत बाणाचा विजय झाला.

परभणीकर ठरवणार असली शिवसेना कुणाची? खासदारकी रंगत आणणार… | Uddhav Thackeray

संजय जाधव हे शिवसेनेच्या आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा म्हणून मतदारसंघात ओळखले जातात. कुठल्याही कामाबाबत संदिग्ध भूमिका न घेता रोखठोक भूमिका व सडेतोड बोलणे हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. यामुळे आलेला व्यक्ती क्षणिक नाराज झाला तरी गोड बोलून वेळ मारून नेण्याचे काम संजय जाधव यांनी कधीही केले नाही. दरवर्षी पंढरपूरची पायी वारी करणे भजन, कीर्तनात सहभागी होण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे धार्मिक क्षेत्रात, भाविक वर्गात त्यांचा चाहता वर्ग आहे. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी निष्ठावान खासदार संजय बंडू जाधव याना पुनः एकदा लोकसभेचे तिकीट दिले आहे. तर त्यांच्या विरोधात महायुतीकडून रासपचे महाजन जानकर हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. महादेव जानकर (Mahadev Jankar) याना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. मोदींचे विकासाचे राजकारण, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांच्या गटाचा पूर्ण पाठिंबा महादेव जानकर यांना मिळणार असला तरी शिवसेनेच्या या मोठ्या बंडाची झळ परभणीला न बसल्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराचे पारडे जड वाटत आहे.

मात्र परभणीत रस्ते, रेल्वे यांसारख्या पायाभूत सुविधांची असणारी दुरावस्था याकडे झालेलं दुर्लक्ष, मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शेतकरी आत्महत्या, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील हेळसांड, बेरोजगारीचं वाढतं प्रमाण या सगळ्यांचीच भीषणता वाढत चाललीये. त्यामुळे येत्या निवडणुकीत परभणीकर त्यांच्या खऱ्याखुऱ्या प्रश्नांना बघून मतदान करणार? की दुसरेच मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी येणार? हे पहावं लागेल.