पारनेर विधानसभा मतदारसंघात राणी लंके आमदारकी कॉम्प्रमाईज करणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अघळ पघळ, साधासुधा, अस्सल गावरान, मनान कोरा पण डोक्याने भल्या भल्यांचा गेम करणारा कार्यकर्ता ते डायरेक्ट विखे पाटलांसारख्या जिल्ह्यातल्या बड्या राजकारणाला पराभवाचं पाणी पाजून खासदार झालेला अवलिया म्हणजे निलेश लंके… पहिल्याच टर्मला आमदार आणि खासदार झालेला निलेश लंकेंचा प्रवास जणू स्वप्नवत वाटावा असा… पण लोकसभा झाली नाही तोच पारनेरमधून निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके आमदार होणार, अशी पोस्टर बॅनर आणि सोशल मीडिया पोस्ट वायरल होऊ लागल्या… शेवटी कार्यकर्ताच तो… पण यामुळे झालं असं की शिवसेनेची मशाल दुखावली… खासदारकीच्या बदल्यात आमदारकी कॉम्प्रमाईज करणार असल्याचा शब्द लंकेंनी आधीच दिला असल्याचं बोललं जातं… त्यामुळे काळजावर दगड ठेवून निलेश लंके आपला हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडणार? की शरद पवारांच्या मदतीनं राणीताईंना विधिमंडळात पाठवणार? या सगळ्यात नगर मधील बिग बी विखे पाटील नेमकं कुणाच्या पारड्यात वजन टाकणार? येणाऱ्या विधानसभेला पारनेरचा आमदार कोण होतोय? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…

अहमदनगरमधला पारनेर हा तसा शिवसेनेचा स्ट्रॉंग बालेकिल्ला… इथं अनेकांनी प्रयत्न केले पण शिवसेनेचा भगवा पारनेर मधून कधीच खाली सरकला नाही… शिवसेनेच्या विजय औटी यांनी तर पारनेरचा पर्मनंट आमदार अशी जणू स्वतःची आगळीवेगळी ओळख तयार करत सलग तीन टर्म… पंधरा वर्ष… मतदार संघावर आपला दबदबा कायम ठेवला… राष्ट्रवादीच्या सुजित झावरे यांनी औटी यांना सलग दोनदा आव्हान देण्याचा प्रयत्न केला… पण गुलाल लागला तो औटी यांनाच… पण पारनेरच्या राजकारणात खऱ्या अर्थाने ट्विस्ट आला तो 2018 साली…

पारनेरमध्ये, Rani Lanke आमदारकी कॉम्प्रमाईज करणार? | Parner Vidhan Sabha

2018 ला उद्धव ठाकरेंच्या पारनेरच्या सभेत गोंधळ झाला अन् स्थितीच बदलली. या गोंधळाचे खापर निलेश लंके यांच्यावर फोडून शिवसेनेने लंकेंची पक्षातून हाकालपट्टी केली… पण ही एक गोष्ट आपल्या राजकारणाला किती लांबवर घेऊन जाईल याची लंकेंनी कधी स्वप्नातही कल्पना केली नसावी… लंके यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आणि ज्या पक्षात राजकारणाची बाराखडी गिरवली त्याच शिवसेनेच्या विजय औटी यांच्या साम्राज्याला धूळ चारत आमदारकी पटकावली… साधासुधा कार्यकर्ता पारनेरचा आमदार झाला… यानंतर कोरोना काळात केलेली कामे, जनतेत मिळून मिसळून राहण्याची त्यांची सवय, वायरल होणारे फोटो यामुळे पहिल्याच टर्मला आमदार निलेश लंके यांचं नाव पुऱ्या महाराष्ट्रात जाऊन पोहोचलं… हे कमी होतं की काय म्हणून राष्ट्रवादीत फूट पडणे… संधी साधून घड्याळ बाजूला सारून पॉलिटिक्स मधलं टाइमिंग साधत तूतरी हाती घेणं… आणि जिल्ह्यातले बिग बी आणि बडे प्रस्थ समजल्या जाणाऱ्या सुजय विखे पाटील यांना दणका देत थेट दिल्ली गाठली…

निलेश लंके यांच्या विजयाची गुंगी अजून उतरली नसेल तोच आता आमदारकीचं मैदान काही दिवसांवर येऊन ठेपलय… पण अगदी लोकसभेच्या प्रचारातच विधानसभेसाठी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा प्रचार सूक्तपणे चालू होता, असं चित्र मतदारसंघात होतं… लंकेचे कार्यकर्तेही यंदा आमदार वहिनीसाहेबच! असं म्हणून त्यांनी अप्रत्यक्ष राणी लंके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला… पण लोकसभेचा निकाल लागल्यानंतरच काही दिवसात उद्धव ठाकरेंनी पारनेरमध्ये केलेल्या हालचाली – मतदारसंघात मशाल पेटवण्याची केलेली भाषा अन् पारनेरमध्ये ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या तीव्र भावना लक्षात घेता पारनेर मतदारसंघ थोड्या ना खुशीने का होईना पण ठाकरे गटाला सोडण्याची वेळ निलेश लंकेंवर येऊन ठेपलीये…खरं म्हणजे पारनेर मतदार संघातील शिवसेनेच्या ताकदीला नाकारून चालणार नाही… ठाकरे गटाने प्रामाणिकपणे काम केलं म्हणूनच पारनेर मतदारसंघातून निलेश लंके यांना तब्बल 38 हजारांचं निर्णायक लीड मिळालं… यात शिवसेनेच्या ताकतीकडे कानाडोळा करून चालणार नाही… मुळात पारनेरची जागा ठाकरे गटासाठी सोडण्याच्या अटीवरच लंकेंना नगरची उमेदवारी मिळाली होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असते… हे जर खर असेल तर लोकसभेच्या मदतीची परतफेड पारनेर मतदारसंघ कॉम्प्रोमाइज करून येणार आहे…

सध्याचं वातावरण बघितलं तर लोकसभेला मिळालेला यश – पारनेर मधून मिळालेलं घवघवीत लीड हे सगळं पाहिलं तर महाविकास आघाडी पारनेरची जागा आरामात जिंकतेय, असं म्हणायला हरकत नाही… पण इथेच एक अडचण आहे आणि ती म्हणजे इच्छुक उमेदवारांची… शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पारनेर तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी काहीही झालं तरी यंदा निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे… त्यामुळे तिकीट वाटपाचा कार्यक्रम सामोपचाराने नीट सोडवता आला नाही, तर बंडखोरी होऊन याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो… महायुतीत ही जागा राष्ट्रवादीची असल्याने अजितदादा गटाकडून बाजार समितीचे माजी अध्यक्ष – जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, सुजित झावरे, काशिनाथ दाते हे आमदारकीसाठी इच्छुक आहेत… भाजपकडूनही प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात ही नाव उमेदवारीसाठी फ्रंटला आहेत…

पण सध्या तरी शिवसेना ठाकरे गटाकडून श्रीकांत पठारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती आतल्या गोटातून येतेय… यामागच कारण असं की, नीलेश लंके यांना खासदार करण्यामागे पारनेरमधील ठाकरे गटानं जीवाचं रान केलं होतं… यात श्रीकांत पठारे यांनी महाविकास आघाडीकडून एकहाती पारनेर तालुका सांभाळला… पण दुसऱ्या बाजूला महायुतीकडून कोण? याचं उत्तर याक्षणी तरी देता येत नाही… त्यामुळे पारनेरचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल? यावर आत्ताच भाष्य करणं थोडं धाडसाचं ठरेल… पण एवढं मात्र निश्चित की उमेदवार कोणताही असो तरी मविआच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी निलेश लंके आपली सारी यंत्रणा कामाला लावतील… तर दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी विखे पाटीलही महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी फोर्स लावतील… त्यामुळे आता यात राजकीय कुरघोड्या, डावपेच, चाली, गटतट, जातीय समीकरण आणि बेरजेचं राजकारण जो करणार तो यशस्वी होणार… असं म्हणायला हरकत नाही… पण राणी लंके यांच्या उमेदवारीसाठी खासदार साहेब अडून बसले तर इच्छुकांची फाटाफुटी होऊन पारनेरची आमदारकी इंटरेस्टिंग वळणावर जाऊन पोहचायला जास्त वेळ लागणार नाही… त्यामुळे पारनेर विधानसभा मतदारसंघाचा निकाल नेमका कसा लागेल? लंके मोठ्या मनानं आपल्या मतदारसंघात मशालीचा उजेड येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील का? पारनेरचा 2024 चा आमदार नेमका कोण? तुमचं मत कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…