हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माधुरी मिसाळ… पुण्याच्या राजकारणात या नावाला मोठे वजन आहे… कारण पर्वती सारख्या संमिश्र विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर सलग तीन टर्म निवडून जाण्याची किमया त्यांनी केली आहे…. राष्ट्रवादीनं अनेक प्रयत्न केले… गरज पडली तेव्हा चेहरेही बदलले… पण निकाल हा माधुरी मिसाळ यांच्याच बाजूने लागला… यंदाही लोकसभेच्या निकालात पर्वतीनं मोहोळांच्या पारड्यात निर्णय टाकलय… एकूणच यंदाही मिसाळ यांच्यासाठी आमदारकीचं घोडे मैदान सेफ आहे… पण यंदा आव्हान राष्ट्रवादीतून नाही तर आपल्या पक्षातूनच मिळणार असल्यानं मिसाळांची धाकधूक चांगलीच वाढलीय… होय, पर्वतीत नो चॅलेंज आमदार असण्याचा… मंत्री पदाच्या रेसमध्येही ज्यांचं नाव आघाडीवर होतं… त्याच मिसाळांची आमदारकी भाजपमुळे धोक्यात आलीय… आणि ती आणलीय… श्रीनाथ भिमाले यांनी… नेमकं हे प्रकरण काय आहे? माधुरी मिसाळ आणि श्रीनाथ भिमाले या दोन्ही भाजप नेत्यांमध्येच उमेदवारीसाठी सुप्त संघर्ष कसा सुरू झालाय? आणि या सगळ्याचा शेवट निकालाच्या दिवशी कसा लागेल? याच प्रश्नांचं केलेलं हे साधं सोप राजकीय डिकोडिंग…
पुणे लोकसभेचा निकाल लागला… मोहोळ खासदार झाले… पण निकालाचा गुलाल उतरला नाही तोच, पर्वती विधानसभेतून आता आमदारकीला लढायचं पण… आणि जिंकायचं पण… अशे पोस्टर्स, सोशल मीडिया पोस्ट मतदारसंघात फिरू लागल्या… भाजपच्या श्रीनाथ भीमाले यांनी खासदारकीला मोहोळांचं काम अगदी जीव तोडून केलं होतं… त्याचाच इम्पॅक्ट म्हणून पर्वती विधानसभेतून भाजपला निर्णायक लीड मिळालं… त्यामुळे आपण केलेल्या कामाचं आमदारकीच्या तिकीटरुपी दान मिळावं… यासाठी खेळलेलं हे प्रेशर पॉलिटिक्स पाहता, तिकीट नेमकं सोडायचं कुणाला? माधुरी मिसाळ की श्रीनाथ भिमाले यांना? हा मोठा प्रश्न येत्या काळात पक्षासमोर असणार आहे…तर दुसरीकडे सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या माधुरी मिसाळ यांनी काहीही झालं तरी पुन्हा एकदा निवडणुकीसाठी दावा सांगितल्यानं भाजपची पर्वती मतदारसंघात मोठी कोंडी झाली आहे.…
2009 ला या मतदारसंघाच्या निर्मितीपासूनच भाजपने इथं आपला दबदबा कायम ठेवला… भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्यावर पर्वतीच्या मतदारांनी डोळेझाक विश्वास ठेवला… म्हणूनच सलग तीन टर्म निवडून येण्याचा… आमदारकीची हॅट्रिक करण्याचा… बहुमान त्यांना मिळाला… शहरी मतदार संघात सलग महिला आमदार निवडून येण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी… या तिन्ही वेळेस माधुरी मिसाळ यांना पारंपारिक लढत ही राष्ट्रवादीने दिली…सचिन तावरे यांनी 2009 ला राष्ट्रवादी कडून तर 2014 ला शिवसेनेकडून आमदारकीसाठी प्रयत्न केले… पण ते फेल ठरले… 2019 ला मात्र आघाडी आणि युती अशा गटांमध्ये झालेल्या लढतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटली… राष्ट्रवादीकडून अश्विनी कदम तर भाजपकडून माधुरी मिसाळ अशी अटीतटीची ही लढत झाली… दोन्ही बाजूला महिला उमेदवार असल्यानं राष्ट्रवादीला निवडून येण्याची आशा होती… पण मैदान मिसाळ यांनी मारत भाजपचा बालेकिल्ला शाबूत ठेवला… माधुरी मिसाळ यांच्या मतदारसंघातील प्लस-मायनस बद्दल बोलायचं झालं तर, सलग तीन टर्म निवडून आल्यामुळे त्यांचा मतदारसंघावर चांगला होल्ड आहे, मार्केट यार्ड शांतीनगर , बिबवेवाडी सिटी प्राईड स्वारगेट हा मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय मतदार हा नेहमी भाजपच्या बाजूने राहिलाय… एकट्या पर्वती विधानसभेतून 27 पैकी तब्बल 23 नगरसेवक एकदा भाजपचे आहेत…
मतदारसंघातील गुजर, मारवाडी समाज हा भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्यानं इथं कमळाला नेहमीच भरभक्कम लीड मिळतं… पक्षाचं, संघाचं मतदार संघातील केडरही बरंच स्ट्रॉंग आहे… त्याचाही फायदा निवडणुकीत पक्षाला होत असतो… पण या सगळ्यात मिसाळ यांच्या काही मायनस बाजू देखील आहेत… सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा मतदारसंघातील जनतेशी कनेक्ट नसतो, अशी ओरड नेहमीच मतदार संघातून होत असते…. त्यातही झोपडपट्टी पुनर्वसन, सिंहगड रस्त्यावरील कोंडी, पर्वती – तळजाई – आंबेडकर वसाहत – पानमळा – लक्ष्मी नगर – जनता वसाहत या भल्या मोठ्या पट्ट्यात मूलभूत सुविधांचीच पूर्तता सलग तीन टर्म आमदार राहूनही मिसाळ यांना करता आलेली नाहीये… छोट्या मोठ्या 43 झोपडपट्ट्या या भागात असताना पक्के रस्ते, पाणी, वीजपुरवठा आणि स्वच्छता अशा अनेक प्रश्नांवर मिसाळ या मायनस मध्ये जातात… पानशेत धरण फुटल्यानंतर स्थलांतरितांचे पुनर्वसन केले… पण त्यांच्या पुनर्विकासासाठी अद्याप विजन आमदारांकडून आलेलं नाहीये… पर्वती तळजाई या दोन्ही टेकड्यांवर वाढलेलं अतिक्रमण, स्काय वॉकची रखडलेली काम, झोपडपट्टीतील गुन्हेगारीच वाढत प्रमाण, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अशा एक ना अनेक तक्रारी आणि समस्यांचा पाढा या मतदारसंघात वाचता येऊ शकतो… पण तरीही याकडे माधुरी मिसाळ यांनी सिरियसली पाहिलय, असं ग्राउंड रियालिटी पाहिल्यावर म्हणता येत नाही… मात्र असं असूनही लोकसभेला मोहोळांना मिळालेलं तीस हजारांचे लीड पाहता जनतेला पक्ष तोच पण चेहरा नवा हवाय की काय? असा प्रश्न उपस्थित करता येऊ शकतो…
त्यात लोकसभेला मिळालेलं भाजपच्या यशाचं क्रेडिट श्रीनाथ भिमाले यांनी स्वतः घेतलंय.. गेल्या पंधरा वर्षापुर्वीच भाजपकडून आमदारकी मागितली होती. त्यावर वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत पक्षाचं काम करत आलो आहे. यातच आता लोकसभा निवडणुकीपासून मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जाण्याचं ठरवलंय. त्यावर वरिष्ठांच्या कानावर देखील घातलं आहे की मला आता लढायचं आहे. त्याच अनुषंगाने माझी तयारी सुरू झाली आहे. मला खात्री आहे की वरिष्ठ मला संधी देतील आणि मी लढणार पण आहेच आणि जिंकणार पण आहेच…. अशा कॉन्फिडन्सने भिमाले यांनी आमदारकीवर क्लेम केल्याने मिसाळ यांच्या अडचणीत बरीच वाढ झाली आहे…पण मिसाळही उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेणार नसून त्यांनी उलट श्रीनाथ भिमाले यांना टोमणा मारून मतदार संघातील भाजपमध्ये राजकीय विस्तव टाकलाय… सुरूवातीच्या काळात पर्वती मतदारसंघात भाजपचे १० नगरसेवक निवडून आलेत. त्यानंतर २३ नगरसेवक निवडून आलेत. असं म्हणत ज्यावेळी शेत सुपीक दिसायला लागतं. त्यावेळी सगळेजण त्यावर तुटून पडतात. आणि त्याआधी तिथे वाळवंट आहे. तेव्हा तिथे कोणी शेती करत नाहीत… असा उपरोधिक टोला मारत काहीही झालं तरी आपण माघार घेणार नसल्याचंच जणू मिसाळ यांनी स्पष्ट केलंय….
दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून या मतदारसंघातून परंपरेप्रमाणे राष्ट्रवादी लढत देत आलीये… पण काँग्रेसचे आबा बागुल पर्वतीच्या जागेसाठी आग्रही आहेत… त्यांचा मतदारसंघात बराचसा जनसंपर्क देखील आहे… तब्बल सहा टर्म नगरसेवक म्हणून काम केल्यामुळे शहरी राजकारणात त्यांनी बराच जमही बसवलाय… म्हणूनच त्यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेऊन ही जागा काँग्रेससाठी सोडावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे…. त्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूने उमेदवार फिक्स नसला तरी पर्वतीचा कौल हा भाजपच्याच बाजूने दिसतोय… त्यातही मेरिटचा विचार करता माधुरी मिसाळ यांना डावलणं भाजपला परवडणार नाहीये… त्यामुळे ७० टक्के का होईना पण मिसाळ यांच्याच नावावर उमेदवारीचा शिक्का मोर्तब भाजपकडून होऊ शकतो… पण संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी जर पक्षाने प्रयत्न केले नाहीत, तर याचा मोठा फटका आगामी काळात भाजपला बसू शकतो… सलग तीन टर्म एक हाती भाजपने लढवलेल्या… आणि जिंकलेल्या देखील बालेकिल्ल्यात यंदा मात्र बराचसा सावळा गोंधळ पाहायला मिळतोय… पण हे सगळं राजकारण एका बाजूला ठेवून मतदारसंघातील जीवन मरणाच्या प्रश्नांबद्दल कुणी बोलणार आहे का? असाही संतप्त सवाल मतदार संघातील जनता विचारू लागली आहे….त्यामुळे झोपडपट्टी ते विकसित भाग… आणि जवळपास संमिश्र समाजाची लोकवस्ती असणाऱ्या पर्वती विधानसभा मतदारसंघात माधुरी मिसाळ आमदारकीचा चौकार मारतील का? भाजप यंदा उमेदवार बदलण्याची घेणार का? की इंटरेस्टिंग रित्या मतदारसंघातील वाऱ्याला वळण येऊन महाविकास आघाडीचा उमेदवार इथून आमदारकीचा गुलाल उधळणार? यांपैकी नेमकं घडेल काय? तुमचा राजकीय अभ्यास काय सांगतो? तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा… …