सातारा – पाटण मार्गावर निघालेल्या एसटी बसमध्ये झाला बिघाड; पुढे घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमध्ये वारंवार तांत्रिक कारणांमुळे बिघाड होत आहे. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. अशीच एक घटना सातारा ते पाटण दरम्यान जाणाऱ्या एसटीच्या बाबतीत घडली. सातारा-पाटण मार्गावर जाणाऱ्या एसटी बसमध्ये कळंत्रेवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे एसटीत असलेल्या प्रवाशांनी गाडीला धक्का देत गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र, एसटी सुरु न झाल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास करावा लगला.

लाखो रुपये खर्च करून एसटी महामंडळाद्वारे सुरु केलेल्या एसटी बसमध्ये बिघाड होत असल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. सातारा-पाटण ही प्रवाशांनी खचाखच भरलेली बस शनिवारी सकाळी ठीक 10 वाजण्याच्या सुमारास निघाली होती. यावेळी एसटी बस कळंत्रेवाडी हद्दीत आली असता बसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. बसमधून जवळपास 35 ते 40 प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, चालक तसेच वाहकाने बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. शेवटी प्रवाशांनीच बसमधून खाली उतरत गाडीला धक्का देण्याचा प्रयत्न केला. धक्का मारूनही बस सुरू झाली नसल्यामुळे अखेर प्रवाशांनी खाजगी वाहतुकीद्वारे प्रवास केला.

प्रवासादरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे प्रवाशांना नाहक मनस्तापासह आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अशा प्रकारामुळे प्रवाशांसह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे परिवहन खात्याने अशा प्रकारामध्ये गांभीर्याने लक्ष घालत प्रत्येक आगारातील एसटी बसेसची डागडुजी करावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.