औरंगाबाद प्रतिनिधी । ३० ते ३५ वर्षे नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्तीचे पेन्शन वेळेवर मिळण्याच्या व उर्वरित आयुष्य सुखाने जगण्याच्या अनेक सेवानिवृत्तांच्या इच्छेला कोषागार विभागाच्या ढिम्म कारभारामुळे सुरुंग लागला आहे. १२ हजार सेवानिवृत्त आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची परवड सुरू आहे. सेवानिवृत्तांच्या वेतन पडताळणी संचिकांचा ढीग कोषागार विभागात पडून असून, ऑनलाईन व संचिका आवकीच्या ज्येष्ठतेनुसारच त्या तपासल्या जात आहेत. शासकीय सेवेची संधी मिळाल्यानंतर जो आनंद कर्मचाऱ्याच्या मनात रुजू होताना असतो, तेवढेच दु:ख आणि वेदना सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वाट्याला येत आहे.
या प्रकारात मराठवाड्यातून लांबवरून येणाऱ्या सेवानिवृत्तांचे जे हाल होत आहेत, ते शब्दांत व्यक्त होणे अवघड आहे. त्यातच काही सेवानिवृत्त अपंग आहेत. त्यांना तर कोषागार विभागातील कर्मचारी अतिशय हीन वागणूक देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. परंतु कर्मचारी कमी आहेत. चार ते पाच कर्मचाऱ्यांवर पूर्ण काम करण्याची जबाबदारी आहे. सगळे काम ऑनलाईन चालते, १२ हजार सेवापुस्तिका सध्या आमच्याकडे आहेत. अशी कारण विभागातील कर्मचारी समोर करतात.
वेतन पडताळणी पुस्तिका पाहताना काही त्रुटी आढळल्या, तर लिपिक पातळीवरच सेवापुस्तिका संबंधित विभागाला पाठविण्यात येते. त्या विभागाकडून संचिका त्रुटी पूर्ण होऊन न आल्यास पुन्हा संचिका पाठविली जाते. १० पुस्तिकांपैकी ८ पुस्तिका नियमित असण्याचे प्रमाण आहे. सातव्या वेतन आयोगामुळे सेवानिवृत्तांच्या पुस्तिका एकदाच विभागाकडे आल्या. पूर्ण कामाचा ताण चार ते पाच कर्मचाऱ्यांवर आहे. असे सांगून लिंगणवाड या कोषागार अधिकाऱ्याने सारवासारव केली आहे.