पाणीटंचाईने जनता हैराण; ‘या’ भागात टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा

Weather
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एप्रिल महिन्यातच तीव्र उष्णतेची लाट अनुभवास येत असून, पाण्याच्या झळा नागरिकांच्या कळांमध्ये भिनल्या आहेत. तापमानात होत असलेल्या सतत वाढीमुळे धरणे , तलाव अन विहिरींमधील जलसाठ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून, अनेक ठिकाणी टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी टँकरच्या सहाय्याने केला जाणारा पाणी पुरवठा कमी पडत आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

या शहरामधील पाणीपुरवठा बंद –

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने जाहीर केले आहे कि, अमरावती अन बडनेरा शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. नेरपिंगळाईजवळील 1500 मिमी व्यासाच्या पाईपलाईनमध्ये गळती झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे २४ एप्रिलपर्यंत जलपुरवठा बंद राहणार आहे. तसेच चिखलदरा अन चांदुर रेल्वे तालुक्यातील सात गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील 776 गावांपैकी 50 टक्के गावांतच तातडीच्या उपाययोजना पोहोचल्या असून, बाकी भाग जलसंकटाशी झगडत आहे. जनावरांनाही पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत.

तलाव पूर्णपणे कोरडा –

चिखलदरा तालुक्यातील कोहना गावातील महिलांना दिवसाचे सहा तास फक्त पाणी भरण्यात घालवावे लागत आहेत. मोथा गावातील तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. टँकरने विहिरीत पाणी सोडून नागरिकांना त्यातून पाणी भरावे लागत आहे. मेळघाट परिसरातील अनेक गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला आहे, तर तलाव कोरडेठाक पडले आहेत.

बहुतांश प्रकल्प कोरडे –

पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांतील बहुतांश जलप्रकल्प कोरडे पडले आहेत. अमरावतीत 46.29% जलसाठा असून 28 प्रकल्प कोरडे व 12 टँकर सुरू आहेत. यवतमाळमध्ये 32.97% जलसाठा असून 6 टँकर, अकोल्यात 31.50%, वाशिममध्ये 25.17% आणि बुलढाण्यात 27.7% जलसाठा आहे, जेथे 31 टँकर सुरू आहेत. या भागात तीव्र जलसंकट जाणवत आहे.

180 टँकरद्वारे विविध वॉर्डांमध्ये पाणीपुरवठा –

चंद्रपूर शहरात जलसंकटाने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मनपा दररोज 180 टँकरद्वारे विविध वॉर्डांमध्ये पाणीपुरवठा करत आहे. ‘अमृत योजना’ संथगतीने राबवल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. तसेच जालना जिल्ह्यातील 64 प्रकल्पांपैकी 3 पूर्ण कोरडे, तर 24 प्रकल्पांमध्ये केवळ मृत साठा उरला आहे. बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पाण्याच्या टंचाईचा सामना –

यवतमाळ जिल्ह्यातील 79 हजार नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. 57 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, तीन कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यात सर्वत्र पाणीटंचाईने थैमान घातले असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही आठवडे उष्णतेचा जोर अधिकच वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पाणी वापरावर काटेकोर नियंत्रणाची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.