सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके
राज्यातील काही पाेलिस निरीक्षक हे आजही महाविकास आघाडीचे सरकार असल्या सारखं वागत आहेत. काही पाेलिस अधिकारी हे हिंदु विराेधी भुमिका घेत असल्याची तक्रार आमच्यापर्यंत आली आहे. त्या सर्वांची नावे आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यापर्यंत पाेहचविणार आहाेत. सातारा जिल्ह्यातील फलटण, महाबळेश्वर, सातारा, पाचगणी हे हिंदू विरोधी भूमिका घेत आहेत. तेव्हा त्या सर्व पाेलिस निरीक्षकांचा सांगून कार्यक्रम करणार असे भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सातारा येथील पत्रकार परिषदेत जाहीरपणे सांगितले. नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.
नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा कसा आणता येईल. यावर आम्ही काम करत आहे. हिवाळी अधिवेशनात तो विषय कदाचित मांडला जाईल. पोलिसांना कोणत्या कायद्यांतर्गंत शिक्षा द्यावी, याबाबत स्पष्टता नाही. परंतु धर्मांतर विरोधी कायदा आणल्यानंतर त्यात स्पष्टता येईल. पोलिस अधिकारी हिंदू विरोधी भूमिका घेत आहेत. त्यांचा बंदोबस्त केला जाईल.
पाटणला आक्रोश मोर्चानंतर पत्रकार परिषद
सातारा जिल्ह्यातील पाटण येथे आज हिंदूत्ववादी संघटनांतर्फ आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आमदार नितेश राणे हे सातारा शहरात आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राणे म्हणाले फलटण, महाबळेश्वर, सातारा, पाचगणी येथील पोलिस खात्यातले काही अधिकारी हिंदू विरोधी भूमिका घेत आहेत. त्याबाबत आमच्या कानावर तक्रारी आल्या आहेत. गृहमंत्री फडणवीस यांना संबंधितांच्याबद्दल आम्ही सांगणार आहाेत असेही राणेंनी नमूद केले.