हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्याचा अधिक प्रमाणात कायापालट होताना दिसत आहे. अनेक विकासकामे जिल्ह्यात होत असून जिल्ह्यातील अनेक तालुक्याचा अनेक विकास कामाच्या योजनेत समावेशही होत आहे. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने स्थानकांच्या आधुनिकी करणासाठी ‘अमृत भारत स्थानक योजना या शीर्षकाखाली नवीन धोरण तयार केले आहे. अमृत भारत स्थानक योजनेत दीर्घकालीन दृष्टीकोनातून स्थानकांचा सतत विकास केला जाणार आहे. या योजनेमध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतची नुकतीच घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत नुकतीच संसदेमधील दालनामध्ये एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व इतर अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीनंतर मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे स्वप्न असलेली फलटणची रेल्वे ही त्यांचे सुपुत्र व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अथक परिश्रम घेत सुरु केली. त्यानंतर आता फलटणवरुन फक्त लोणंद न राहता आता पुणे रेल्वे सुद्धा सुरु करण्यात आलेली आहे.
खा. रणजितसिंह यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आगामी काळामध्ये फलटण-पंढरपूर व फलटण-बारामती रेल्वे सुद्धा पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे खासदार रणजितसिंह यांच्या मागणीनुसार फलटण रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्थानक योजनेमध्ये समावेश करत आहोत. माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे अतिशय उत्कृष्ट असा पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामूळे माढा लोकसभा मतदारसंघातील बरेच प्रश्न निकाली निघाले आहेत. आगामी काळामध्ये जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सुद्धा खासदार रणजितसिंह यांच्या पाठपुराव्याने निकाली निघतील, असा विश्वास सुद्धा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला.