हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑक्टोबर महिन्यानंतर गुलाबी थंडीची चाहूल लागते. त्यामध्ये प्रत्येकाची फिरण्याची इच्छा होत असते . नोव्हेंबर म्हटलं कि दिवाळीचा हंगाम , त्यामुळे मुलांना तसेच अनेक कामगारांना सुट्ट्या दिल्या जातात. म्हणून वीकेंडमध्ये मित्र-परिवारासोबत बाहेर जाण्याची ही योग्य वेळ ठरू शकते . पण कुठे फिरायला जायचे हे समजत नाही . त्यामुळे खूप गोष्टींमध्ये गोंधळ निर्माण झालेला दिसतो . तर आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यातल्या थंड वातावरणात भारतातील काही अशी ठिकाणे सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही ते दिवस कधीच विसरू शकणार नाही . तर चला जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्यात कुठे फिरायला जाणे योग्य ठरेल .
रन ऑफ कच्छ
कच्छ गुजरात राज्यातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध प्रदेश आहे. भारतातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे. रन ऑफ कच्छ या विशाल खाऱ्या रणभूमीमुळे त्याला अनोखी अशी ओळख मिळालेली आहे . हे लोकसंस्कृती आणि हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे. येथे पारंपारिक कच्छी वस्त्रे, कापड तसेच चांदीच्या दागिन्यांची निर्मिती केली जाते. हिवाळ्यात येथे अनेक सण साजरे केले जातात . त्यामुळे अनेक पर्यटक कच्छी संस्कृतीचा अनुभव घेऊ शकतात. तसेच इथे धोलावीरा एक प्राचीन हडप्पा संस्कृतीचं स्थळ असून ते UNESCO वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर हिवाळ्यातील सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली कच्छ रणची पांढरी वाळू पाहण्याचा सुंदर अनुभव मिळेल. या ठिकाणी शाही विजय विलास पॅलेस पाहण्यास मिळेल .
गोवा , शिलॉंग
मित्रांसोबत फिरायला गोवा हे नेहमीच एक लोकप्रिय ठिकाण राहिले आहे. नोव्हेंबरमध्ये गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) आयोजित होतो, ज्यात जगभरातील समकालीन आणि क्लासिक चित्रपट दाखवले जातात. या हंगामात चित्रपटप्रेमींसाठी हे ठिकाण अगदी योग्य आहे. संगीत आणि कला महोत्सवाचा उत्तम अनुभव हवा असेल तर तुम्ही शिलॉंगला भेट देऊ शकता .मेघालयमधील शिलाँगमध्ये हलक्या थंडीत तीन दिवसीय चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल साजरा केला जातो, ज्यात संगीत, कला आणि संस्कृतीचा आनंद घेता येतो. यावर्षी हा उत्सव 17 ते 19 नोव्हेंबरच्या दरम्यान आयोजित केला जाणार आहे.
शांतिनिकेतन , सुवर्णमंदिर
युनेस्कोने नुकतेच शांतिनिकेतनला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. येथे नैसर्गिक सौंदर्य, संग्रहालयं आणि अनोखी बाजारपेठा यांचा अनुभव तुम्हाला घेता येईल . म्हणून कोलकाताजवळील शांतिनिकेतन हे नोव्हेंबरमध्ये भेट देण्यास उत्तम ठिकाण ठरू शकते . जर तुम्हाला सुवर्णमंदिराची रोषणाई आणि शहरातील उत्सवाचे वातावरण याचा अनुभव घ्याचा असेल तर अमृतसरला नक्की भेट द्या . गुरुपर्वाच्या निमित्ताने सुंदरपणे सजलेले असते. याशिवाय पंजाबच्या स्वादिष्ट पदार्थांचाही आस्वाद घेता येईल.