PM Kisan Mandhana Yojana। देशातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन सक्षम व्हावे आणि त्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी केंद्रातील मोदी सरकार नेहमीच प्रयत्नशील असतं. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकार कडून सतत वेगवेगळ्या आणि नवनवीन योजना राबवल्या जात असतात.. आज आम्ही तुम्हाला केंद्र सरकारच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, त्यामाध्यमातून शेतकऱ्यांना दर महिन्याला ३००० रुपये पेन्शन मिळतेय….. वृद्धपकाळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकारने ही योजना सुरु केलीय… प्रधानमंत्री किसान मानधन योजना असं या योजनेचे नाव असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी काय पात्रता आहे ते आज आपण जाणून घेऊयात……
तर प्रधानमंत्री किसान मानधन योजने’ (PM Kisan Mandhana Yojana) अंतर्गत, शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा ३,००० रुपये पेन्शन दिले जाईल. लहान आणि गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या उतारवयात आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. १८ ते ४० वयोगटातील शेतकरी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेऊ शकतात. या शेतकऱ्यांना दर महिन्याला ५५ ते २०० रुपये भरावे लागतील. ही रक्कम शेतकऱ्याच्या वयावर अवलंबून असते. यानंतर वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर, शेतकऱ्याला दर महिन्याला ३,००० रुपये पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल.
खास बाब म्हणजे शेतकरी दर महिन्याला जितके पैसे जमा करेल तितकीच रक्कम सरकार कडून त्याला अनुदान सुद्धा मिळेल. उदाहरणार्थ, जर एखादा शेतकरी प्रधानमंत्री किसान मानधन योजने’ अंतर्गत दरमहा १०० रुपये भरत असेल देत असेल तर सरकार सुद्धा १०० रुपये देईल. यामुळे शेतकऱ्यांचा पेन्शन फंड आणखी मजबूत होईल.
असा घ्या लाभ – PM Kisan Mandhana Yojana
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी, शेतकऱ्यांना नागरी सुविधा केंद्रातून किंवा राज्य नोडल ऑफिसर मार्फत मोफत नोंदणी करावी लागेल. रेजिस्ट्रेशन करताना आधार कार्ड, बँक खाते क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर पेक्षा कमी शेती असणं आवश्यक आहे.