PMBJK : भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना प्रवासाचा सुखद अनुभव देण्यासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देते. रेल्वे कडून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये आता आणखी भर पडणार आहे. आता भारतातील रेल्वे स्टेशन्सवर १०० पेक्षा जास्त जनऔषधी केंद्र (PMBJK) स्थापन करण्यात येणार आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही प्रधान मंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे (PMBJK) स्थानकांच्या फिरत्या भागात आणि चौकांमध्ये स्थापित केली जातील. ही केंद्रे चालवण्यासाठी खास परवानाधारक व्यक्तींची निवड केली जाईल. रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वेने ऑगस्ट 2023 मध्ये PMBJK ची स्थापना करण्यासाठी एक धोरण आराखडा तयार केला होता . सुरुवातीला, पायलट प्रोजेक्ट म्हणून 50 स्थानकांची यादी करण्यात आली आणि त्याचे यावर्षी मार्च मध्ये काम सुरु करण्यात आले.
रोजगारात पडेल भर
रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “प्री-फेब्रिकेशन स्ट्रक्चर्ससह देशभरातील विविध ठिकाणी 12.53 लाख रुपये खर्चून अतिरिक्त 61 पीएमबीजेके (PMBJK) वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. पुढे बोलताना रेलवे अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे स्टेशनवर खुली केली जाणारी ही केंद्रे स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देतील. शिवाय यामुळे अनेकांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे.
केंद्रांचा होणार ई-लिलाव
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र (PMBJK) योजनेंतर्गत, PMBJK ही प्रवाशांची अत्यावश्यक सुविधा मानली जाते आणि त्यानुसार, रेल्वे स्थानकांमध्ये सोयीस्कर जागेमध्ये ही आउटलेट उघडली जातील. जेणेकरून प्रवाशांना याचा लाभ घेता येईल. मिळालेल्या माहितीनुसार स्टॉल्स संबंधित रेल्वे विभागांसह ई-लिलावाद्वारे दिले जातील. औषध दुकान चालविण्यासाठी आवश्यक परवानग्या आणि परवाने व्यावसायिकांना प्राप्त करावे लागतील.
.