मुलीचा 16 व्या वर्षात लागणारा विवाह पोलिस, अंगणवाडी सेविकांनी रोखला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | चरेगाव (ता. कराड) येथील जोतिबाच्या मंदिरात चाफळ विभागातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा 16 व्या वर्षात लावण्यात येणारा विवाह उंब्रज पोलिसांनी व चाफळ भागातील 1 तलाठी, अंगणवाडी सेविकांनी रोखला. अल्पवयीन विवाह प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. चाफळ भागातील अंगणवाडी सेविकांनी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पवयीन मुलीचा विवाह रोखल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, चाफळ विभागातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह चरेगाव येथील जोतिबाच्या मंदिरात एका मुलाशी 12.30 वाजता होणार असल्याची माहिती चाफळ विभागातील अंगणवाडी सेविकांनी उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांना दिली. याची तत्काळ दखल घेत सहायक पोलिस निरीक्षक गोरड यांच्या नेतृत्वाखाली हवालदार अमृत आळंदे, संजय धुमाळ, चाफळ विभागातील ग्रामसेवक तात्यासो शेळके, संचिन खोचरे यांनी चरेगाव येथील जोतिबाच्या मंदिरात धाव घेतली. मुलीची जन्मतारीख 29 सप्टेंबर 2006 असल्याचा मुलींच्या आईने सांगितले. त्यानुसार मुलीचे वय 16 वर्ष 2 महिने 15 दिवस भरत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी मुलीशी मुलामुलींच्या आई-वडील व काही राजकीय पुढारी यांच्याशी चर्चा करून हा विवाह बेकायदेशीर असून, हा विवाह केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले. त्यानंतर हा विवाह मुलांच्या आई-वडिलांनी न करण्याचा निर्णय घेऊन मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी कारवाई न करता दोन्ही बाजूच्या मंडळींना आपापल्या गावाकडे जाण्याचा सल्ला दिल्यानंतर दोन्ही बाजूची वराडी मंडळी लग्न न करता निघून गेली.