औरंगाबाद | शहरात वाढत्या मंगळसूत्र चोरीच्या घटना रोखण्यासाठी आणि चोरांच्या शोधासाठी शहर पोलीस दलाने विशेष मोहिम राबवत शुक्रवारी २४२ पल्सर दुचाकींची तपासणी केली. शहरात घडलेल्या मंगळसूत्र चोरीच्या गुन्हयात आरोपींनी बजाज पल्सर या दुचाकींचा वापर केल्याचे आजवरच्या घटना तसेच सीसीटीव्ही फुटेजवरुन निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे अशा काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी दिवसभरात विशेष मोहीम राबवून पोलिसांनी नाकाबंदी करुन २४२ काळया रंगाच्या पल्सर दुचाकींची तपासणी केली. यापुढे मंगळसूत्र चोरीचे गुन्हे घडु नये यासाठी अशा प्रकारची मोहिम राबवीली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नागरीकांनी आपल्या भागात दक्ष राहुन संशयीत व्यक्ती अथवा पल्सर दुचाकी व विनानंबरच्या इतर मोटारसायकल दिसून आल्यास त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाच्या १०० क्रमांकावर किंवा ०२४०-२२४०५०० यावर संपर्क साधावा असे आवाहन शहर पोलीस दलाने केले आहे.