Heeraben Modi Demise : देशभरातील नेते हळहळले; राजकीय वर्तुळातून हिराबेन यांना श्रद्धांजली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हीराबेन मोदी यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. देशभरातील राजकीय नेत्यांनी हिराबेन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिराबेन मोदी यांच्या निधनानंतर ट्विट करत म्हंटल की, नरेंद्रभाई, तुमच्या आईच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले. आयुष्यात कधीही भरून न येणार हे नुकसान आहे! त्यांच्या निधनाबद्दल माझी श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो…

दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही हिराबेन मोदी यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आदरणीय माताजी हिराबेन यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. आई ही माणसाच्या आयुष्यातील पहिली मैत्रीण आणि गुरू असते, आईला गमावल्याचे दुःख हे जगातील सर्वात मोठे दुःख आहे. हिरा बा यांनी कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी केलेला संघर्ष सर्वांसाठी आदर्श आहे. त्यांचे त्यागाचे तपस्वी जीवन सदैव आपल्या स्मरणात राहील. या दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण देश पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कुटुंबासोबत उभा आहे. करोडो लोकांच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत. ओम शांती असं म्हणत अमित शाह यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्विट करत हिराबेन मोदी याना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून अतीव दुःख झाले. आम्ही सर्व नरेंद्र मोदीजी यांच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या मातोश्रींच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली असं एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, हीराबेन मोदी यांचा जन्म 18 जून 1923 मध्ये झाला होता. याच वर्षी त्यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवसही मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला होता. स्वतः मोदी आईच्या वाढदिवसासाठी गांधीनगरला आले होते. त्यांनी आईचे पाय धुवून आशीर्वादही घेतले होते. हिराबेन मोदी यांचा पंतप्रधान मोदींना मोठा आधार होता. मोदी आणि त्यांच्या आईंचे एकमेकांप्रति असलेलं प्रेम हे संपूर्ण देशाला माहीत आहे. आज त्यांच्या निधनाने मोदींचा आधारच हरपला अस म्हंटल तरी वावग ठरणार नाही.