बिहार निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार ; शिवसेनेशी युती नाहीच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे.बिहार मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीही निवडणूक लढवणार आहेत. नितीश कुमार आणि भाजप यांची आघाडी आधीच ठरली असून आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचीही युती होईल अशी अपेक्षा होती परंतु बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे. बिहारमध्ये शिवसेनेसोबत युती करणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केलं.

बिहार निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) यांच्यासोबत जाण्याची राष्ट्रवादीची तयारी होती. आम्ही काँग्रेस आणि राजदबरोबर चर्चा केली. आम्ही केवळ 4 ते 5 जागा मागितल्या, पण आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.

बिहारमध्ये भाजप, जेडीयू यांचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याची गरज होती, मात्र ते झालं नाही. त्यामुळे बिहारमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत, शिवसेनेबरोबर युती करणार नसल्याचंही पटेल यांनी स्पष्ट केलं.

बिहारमध्ये शिवसेनेने 50 जागा लढविण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार असंही म्हटलं जात होतं. मात्र यासंदर्भात सेनेशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. तर शिवसेना काँग्रेससोबत जाऊ शकते अशी शक्यता शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केली होती.

यापूर्वी संजय राऊत म्हणाले होते की बिहार निवडणुकीत कुणासोबत युती करायची याबाबतचा अद्याप निर्णय झालेला नाही. ‘बिहारचे अनेक स्थानिक पक्ष आमच्यासोबत निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे मी पुढच्या आठवड्यात पाटण्याला जाणार आहे. त्यावेळी यावर चर्चा होईल’ असं संजय राऊतांनी सांगितलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment