एका पत्रकाराचं बाळासाहेबांना खुल पत्र…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आदरणीय बाळासाहेबजी…

सप्रेम नमस्कार
…………………..
मी अनेक वर्षांपासून आपलं राजकारण पाहतोय. ज्यांच्याबद्दल आदर वाटावा अशा आंबेडकरी चळवळीतील नावांपैकी आपलं एक ठळक नाव.शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यावर नांदेड लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवली होती,तेव्हा पत्रकार म्हणून मी आपल्या प्रचारात होतो.हे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की, मी आपला विरोधक नाही.

काल शिवाजी पार्कवर झालेली आपली आणि खा.ओवेसी यांची भाषणं मी लाईव्ह ऐकली.दोन्ही भाषण लॉजिकल होती.त्यात चुकीचं काही नाही.पण आजच्या स्थितीत कॉन्ग्रेस झटकून टाकण्यासारखी नाही.कॉन्ग्रेस पुरोगामी नाही,तशी ती प्रतिगामीही नाही,ती आस्तिक आहे ना नास्तिक.भारतीय समाजाचं सगळं बेंगरूळ चित्र कॉन्ग्रेस मध्ये पाहायला मिळतं.या पक्षावरचा आपला राग रास्त आहे.संधी मिळेल तेव्हा त्यांचे वस्त्रहरण,चिकीत्सा करायला हवीच.मात्र आजच्या निर्णायक क्षणी, कॉन्ग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, दोघेही तेवढेच समान शत्रू आहेत,ही भूमिका आत्मघातकी आहे.बहुजन वंचित आघाडीची मतं,ही भाजपाची नाहीतच.. त्यामुळं कॉन्ग्रेस,भाजपा दोन्ही नको,असं म्हटलं की,भाजपाचा आपोआप फायदा होतो,हे साधं सत्य आहे.
कॉन्ग्रेस कितीही वाईट असली तरी,तिच्यात सुधारणेला वाव आहे.टीका करायला,संघर्ष करायला संधी आहे.ती बदलू शकते.कारण कॉन्ग्रेसच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी हिटलरी संघटना नाही.मनुवादी विचारसरणी नाही.भाजपा आणि कॉन्ग्रेस मध्ये हा मुलभूत फरक आहे.गेल्या साडे चार वर्षांत भाजपाने कोणता अजेंडा राबवला,तो तुम्ही जाणताच. माणसं भयभीत करण्यासाठी आणिबाणीची गरज नाही,हे त्यांनी दाखवून दिलंय. सुप्रिम कोर्टासह सगळ्या संस्था आमच्या नियंत्रणाखाली आहेत,हे ते जाहीररित्या सांगत आहेत.राष्ट्रपती तर त्यांचेच आहेत…पुढचं संकट भयानक आहे.त्याला रोखायचं की,येऊ द्यायचं,याचा निर्णय करावा लागणार आहे.
ओवेसींनी मुस्लिम समाजाला कितीही शपथा घातल्या तरी, मुस्लिम समाज त्यांच्या मागे उभा राहणार नाही.मोदी राजवटीत हा समाज पोळून निघालाय.तो यावेळी चूक करणार नाही.भाजपा विरोधात जो कोणी संभाव्य विजयी उमेदवार असेल,त्यांना मुस्लिम मते देतील.एवढी निर्णयक्षमता त्या समाजात आहे.

मात्र बाळासाहेब …
आपल्या समर्थकांची मतं वंचित आघाडीच्या उमेदवारांनाच मिळतील.ती इतरत्र जाणार नाहीत.मतांचं गणित कसंही मांडलं तरी, बहुजन वंचित आघाडी स्वबळावर विजय मिळवू शकत नाही,हे वास्तव कसं नाकारायचं?सभांना होणारी अभूतपूर्व गर्दी मतांत रूपांतरीत होत नाही,हा अनुभव तुम्हीही अनेकदा घेतलाय.भक्त ,मग तो कोणाचेही असोत,त्यांना वास्तवाचे भान नसते.त्यांचं ऐकणं नुकसानीचं ठरतं…
आदरणीय बाळासाहेब,
मला कॉन्ग्रेस, राष्ट्रवादी
काँग्रेसची अजिबात चिंता नाही.उद्या मोदी पुन्हा पंतप्रधान बनले तर,या दोन्ही पक्षांतील सरंजामदार नजराण्याची ताटं घेऊन मोदींच्या दरबारात रांगेनं उभं राहतील.नजराणे घेऊन मोदी त्यांना त्यांच्या जहागिऱ्या पुन्हा बहाल करतील.मोदींना खरोखरच भ्रष्ट्राचाराबद्दल चीड असती तर,यातील निम्म्यापेक्षा अधिक लोक जेलमध्ये राहिले असते…पण सम्राट मोदींना जहागिरदारच हवेत…

पण तुम्ही काय करणार?तेव्हा लढायला तुमच्या सोबत कितीजण येणार? मुळात लढण्याचं स्वातंत्र्यचं राहणार नाही,तेव्हा काय करणार?भाजपाला ना घटनेबद्दल प्रेम आहे ना लोकशाहीवर.या देशाचं हिंदुराष्ट्र करण्यासाठी,देशाचं,समाजाचं कितीही वाटोळं करण्याची त्यांची तयारी आहे.त्यांचा तोच एकमेव अजेंडा आहे.
कॉन्ग्रेस आणि भाजपातील,एवढा फरक तरी तुम्ही नक्की मान्य कराल!

आदरणीय बाळासाहेब,
ही काल्पनिक भीती नाही.हे तुम्हीही जाणताच.अनेक लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे.निवडणुका कशा होतात, किती ,कशा यंत्रणा उभाराव्या लागतात, रातोरात कसे बदल होतात,आपले म्हणणारे आपल्या डोळ्यासमोर कसे विकले जातात,हे ही तुम्ही अनेकवेळा बघितलंय….
बाळासाहेब…
खरं सांगायचं तर मला ना कॉन्ग्रेस, राष्ट्रवादीची चिंता आहे , ना बहुजन वंचित आघाडीची.मला खरी चिंता आहे माझ्या स्वातंत्र्याची…
मला खुलेपणानं बोलता,लिहता येईल का नाही याची…
कॉंग्रेस राजवटीत, पत्रकार म्हणून मी सत्तेच्या विरोधात लिहीत होतो…भाजपा राजवटीत काही प्रमाणात हेच केलं.पण सत्तेला जाब विचारणाऱ्या अनेक स्वतंत्र पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या सरकारने केलाय…
तो कायमचा बंद होऊ नये,या तळमळीपोटी हे बोलतोय….
आपण माझ्या भावना समजून घ्याल..या अपेक्षेसह.

–  महारुद्र मंगनाळे

Leave a Comment