राज्यसभा निवडणूक: भाजपने ज्योतिरादित्य शिंदेंना तर काँग्रेसने दिग्विजय सिहांना दिली उमेदवारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ । काँग्रेससोडून भाजपच्या गोटात सामील झालेल्या ज्योतिरादित्य शिंदेंना अखेर भाजपने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. शिंदे यांनी काँग्रेस पक्ष सोडताना आपल्यासोबत काँग्रेसच्या २२ आमदारांनाही फोडलं. त्यामुळेच राज्यात कमलनाथ सरकार कोसळलं. आता ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या तिकीटावर राज्यसभेच्या मैदानात उतरले असताना दुसरीकडे काँग्रेसच्या तिकिटावर दिग्विजय सिंह यांना राज्यसभेवर धाडण्याची तयारी करण्यात आली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, मध्य प्रदेशात राज्यसभेच्या ३ जागांसाठी ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेर सिंह सोलंकी यांना संधी मिळाली आहे. तर काँग्रेसकडून दिग्विजय सिंह यांच्यासोबत फूल सिंह बरैया यांना तिकीट देण्यात आलं आहे. काँग्रेसकडून दिग्विजय सिंह यांना तर भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे यांना पहिली जागा निश्चित मानली जात आहे. त्यामुळे, दोन्हीही नेते राज्यसभेत पोहचण्यात यशस्वी ठरतील, असं समजलं जातं आहे.

परंतु, मुख्य पेच आहे तो केवळ तिसऱ्या जागेचा. काँग्रेसच्या २२ आमदारांच्या राजीनाम्यानंतर राजकारणाचं संपूर्ण गणितंच पालटलं आहे. त्यामुळे तिसरी जागा आता आणखीनच चुरशीची झाली आहे. राज्यात कमलनाथ सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी बहुमत सिद्ध करताना त्यांच्या गोटात ११२ आमदार होते. यातील १०७ आमदार भाजपचे होते तर सपा, बसपा आणि अपक्षांनी शिवराज सरकारला समर्थन दिलं होतं.

दरम्यान, कोरोना फैलाव सुरु असताना स्थगित करण्यात आलेल्या राज्यसभा निवडणुकीला आता निवडणूक आयोगानं परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या १० राज्यांच्या २४ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली. या सर्व जागांसाठी येत्या १९ जून रोजी निवडणूक पार पडणार आहे. राज्यसभा निवडणुकीत आंध्र प्रदेश ४, गुजरात ४, झारखंड २, मध्य प्रदेश ३, राजस्थान ३ तसंच मणिपूर-मेघालयाच्या १-१ जागेचा समावेश आहे. तसंच जून-जुलैमध्ये रिकाम्या होणाऱ्या अरुणाचल प्रदेश १, कर्नाटकच्या ४ आणि मिझोरमच्या एका जागेवरही ही निवडणूक पार पडणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment