ईडी, सीबीआयला चीन आणि पाकिस्तानची सुपारी देऊन सीमेवर पाठवा ; शिवसेनेचा भाजपला चिमटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधकांना नमवण्याचे तंत्र ईडी, सीबीआयला माहीत आहे असा विद्यमान राज्यकर्त्यांचा समज आहे. त्यामुळं या संस्थांना राष्ट्रीय शौर्य गाजवण्याची संधी मिळायला हवी. ईडी आणि सीबीआयला चीन व पाकिस्तानची सुपारी देऊन सीमेवर पाठवा. चीन, पाकिस्तान गुडघे टेकून शरण येतील,’ अशी खोचक टीका शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनानं सध्या दिल्ली दणाणून गेली आहे.आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठ्याकाठ्या, थंड पाण्याचे फवारे, अश्रुधुराची नळकांडी फोडण्यात आली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात खलिस्तानी घुसल्याचा दावाही भाजपच्या नेत्यांनी केला.ही संधी साधून शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ‘एखादा विषय हातातून निसटला की ‘हिंदुस्थान-पाकिस्तान’ हा खेळ सुरू करायचा ही त्यांची हातचलाखी ठरलेलीच आहे. शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी जिद्दीने लढतो आहे. तो पंजाबचा आहे म्हणून त्यास देशद्रोही, खलिस्तानवादी ठरवले जात आहे. हा विचार दळभद्रीपणाचेच लक्षण आहे,’ अशी घणाघाती टीका शिवसेनेनं केली आहे.

एकीकडे आपल्याच शेतकऱ्यांना दिल्लीत घुसू दिले जात नाही, दुसरीकडे चीनचे सैन्य आमच्या हद्दीत घुसून ठाण मांडून बसले आहे. शेतकऱ्यांवर फवारे मारले जात आहेत, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत, पण हा बलप्रयोग लडाख किंवा जम्मू-कश्मीरात केला जात नाही. महाराष्ट्रासह देशभरात राजकीय विरोधकांना चिरडण्यासाठी भाजप सरकार सर्व प्रकारचे हातखंडे वापरत आहे. मग ती जिद्द देशाच्या दुश्मनांशी लढताना का दिसत नाही?,’ असा प्रश्न शिवसेनेनं केला आहे.

लडाख आणि काश्मीरातील दुश्मनांशी आपले सैन्य लढत आहेच, पण त्या जोडीने सरकारने आपल्या ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे. नाहीतरी हल्ली देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरूच आहे. दिल्लीच्या सीमेवर आपल्याच शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवून मारले जात आहे, तर काश्मीर सीमेवर अतिरेकी आमच्या सैनिकांचे बळी घेत आहेत. तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा! त्याशिवाय पर्याय नाही,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment