पुणे : देशातील सर्वच राजकीय व्यवस्था बरबटलेली असल्याने राजकीय पक्ष हे खोक्याची संस्कृती बनलेले आहेत. यामुळे विकासाच्या नावाने चांगभलं असा वैतागलेला सूर जनतेमधून निघताना दिसत आहे. खरे राजकारण हे सेवेचे असल्याने याचे व्रत धारण करावे.”असे विचार ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोेजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून साहित्यविश्व प्रकाशनातर्फे कवी वि. वा. यशवंतराव लिखित ‘ईकासाच्या नावानं चांगभलं’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन टिळक रोड येथील महाराष्ट्र साहित्य परिषद येथे डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या प्रसंगी राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे अध्यक्षस्थानी होते. तसेच मानवीहक्क विश्लेषक व प्रसिद्ध वकील अॅड. असीम सरोदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच साहित्यविश्व प्रकाशनचे विक्रम मालन आप्पासो शिंदे, निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त किरण काळे, प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोकराव मोरे उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले,“ या पुस्तकातून कवीने आपली भावना मांडताना त्यांना खरा समाजवाद व लोकशाही अभिप्रेत आहे. कवीतेत कुटुंब, राष्ट्र, देश आणि विश्वाची भूमिका मांडण्याचे सामर्थ्य असते. त्या मंदिर, मस्जिद व कोणत्याही धार्मिक स्थळात न अडकता सर्वव्यापी असतात. या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून कवीने सामाजिक भान लक्षात ठेवून ज्वलंत विषयांवरील विचार शब्दरूपात मांडले आहेत. जे वास्तववादी आहेत.”
यावेळी अभिमन्यू काळे म्हणाले,“वर्तमानकाळात इंग्रजी भाषेने देशातील सर्व भाषेची जागा घेतली आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की पुढील काळात मराठीची प्रमाण भाषा टिकेल का. हे टाळण्यासाठी इंग्रजी भाषेऐवजी आपली बोली भाषा आणि प्रमाण भाषेचा वापर रोजच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात करावा. भाषा ही संवाद साधण्यासाठी असते याचे ही भान सर्वांनी ठेवावे.
अॅड. असीम सरोदे यांनीही यावेळी आपलं मत व्यक्त करत म्हंटल की,“ आजची लोकशाही टिकवायची असेल तर लेखक, कवी आणि टिकाकार यांचे सातत्याने लिखाण गरजेचे आहे. परिवर्तनाचे विचार असल्यास दर्जेदार कविता करणे सोपे होते. कविता म्हणजे अभिव्यक्ती. समाजातील अंधार दूर करण्याचे कार्य लेखनीतून होत असते. सामाजिक भान असल्यास कवितेला सत्यात उतरविता येते.
वि.वा.यशवंतराव म्हणाले,“समाजात घडणार्या वाईट घटनांवरील भाष्य कवितेच्या पुस्तकात काव्य रुपाने मांडले आहे. आज ज्या पद्धतीने समाज वेगळ्या वाटेने जाताना मानवी मन तुडवले त्या विरूद्ध आवाज उठविला आहे. सामाजिक सलोख्यातून संपूर्ण समाज एकत्रित यावा हीच भावना प्रकट करण्याचा प्रयत्न केला आहे. या काव्य संग्रहाला चित्रकार अरविंद शेलार यांनी आकर्षक व सुंदर चित्र रेखाटलेले आहे. विक्रम मालन आप्पासो शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सुजीत काळंगे यांनी सूत्रसंचालन केले. योंगेद्र बांगर यांनी आभार मानले