हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS) ही गुंतवणूकदारांसाठी एक विश्वसनीय आणि सुरक्षित पर्याय ठरत आहे. त्यामुळे या स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. आज आपण याच स्कीमविषयी जाणून घेणार आहोत.
आकर्षक व्याजदर आणि ठेवीची मर्यादा
सध्या POMIS योजनेवर 7.4% वार्षिक व्याजदर मिळत आहे. या योजनेत व्यक्तिगत खात्यासाठी जास्तीत जास्त 9 लाख रुपयांपर्यंत तर संयुक्त खात्यासाठी 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुकीची मर्यादा आहे. संयुक्त खात्यातील गुंतवणुकीवर मिळणारे व्याज धारकांमध्ये समान प्रमाणात विभागले जाते.
खाते उघडण्याचे नियम
ही योजना कोणत्याही प्रौढ व्यक्तीसाठी खुली असून जॉइंट खातेही उघडता येते. पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने खाते उघडू शकतात. तसेच, 10 वर्षे पूर्ण झालेली मुले स्वतःच्या नावाने गुंतवणूक करू शकतात. खाते उघडण्यासाठी किमान 1,000 रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. त्यानंतर 1,000 रुपयांच्या पटीत रक्कम वाढवता येते.
या योजनेत वार्षिक मिळणारे व्याज 12 हप्त्यांमध्ये विभागले जाते आणि दर महिन्याला खात्यात जमा होते. जर व्याज दरमहा काढले नाही तर ते पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा राहते आणि पुढील व्याजासोबत जोडले जाते. त्यामुळे ही योजना नियमित उत्पन्नासाठी उत्तम पर्याय ठरत आहे.
मॅच्युरिटी कालावधी
POMIS योजनेची मुदत 5 वर्षे आहे. या योजनेत मुदत संपल्यानंतर नव्याने गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध आहे. मुदत संपल्यावर व्याजदर नव्या नियमांनुसार ठरवला जातो.
मासिक उत्पन्न किती मिळू शकते?
जर कोणी 15 लाख रुपयांची संयुक्त गुंतवणूक केली तर त्याला वार्षिक 1,11,000 रुपये व्याज मिळते. जे महिन्याला 9,250 रुपयांच्या हप्त्यांमध्ये उपलब्ध होते. तर 9 लाख रुपयांच्या वैयक्तिक गुंतवणुकीवर वार्षिक 66,600 रुपये मिळतात. जे महिन्याला 5,550 रुपयांप्रमाणे वितरित होते.